यांत्रिक युगातही बैलगाडीची जागा कायम
By Admin | Updated: April 30, 2015 01:07 IST2015-04-30T01:07:02+5:302015-04-30T01:07:02+5:30
काळ बदलला, वेळ बदलली या आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाच्या युगात सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहे.

यांत्रिक युगातही बैलगाडीची जागा कायम
गोंदिया : काळ बदलला, वेळ बदलली या आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाच्या युगात सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल
होत आहे. शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा मोठया प्रमाणावर वापर होत असला तरीही बैलगाडीची जागा अद्याप कायम आहे. काळाच्या ओघात मात्र लाकडीऐवजी लोखंडी बैलगाडी बनविण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून ग्रामीण भागातील दळणवळणाचे साधन म्हणून बैलगाडीचा वापर होत आहे. शेतातील शेतमाल घरापर्यंत आणायला आजही बैलगाडीला तेवढेच महत्त्व आहे. पूर्वी वऱ्हाड मंडळींना लग्न सोहळ््यापर्यंत पोहोचायला बैलगाडीचाच वापर केला जात होता. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बदलाचे वारे वाहत आहे. बदला बरोबर बैलगाडीचे स्वरूपही बदलत चालले आहे. लाकडी गाडी तयार करण्याचा व्यवसाय पूर्वीपासून होता. पूर्वीसुतार सागवानपासून टिकावू दर्जेदार बैलगाड्या बनवित होते.
आज सागवान लाकूडही दुर्मिळ झाले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी बाभळीच्या लाकडापासून बैलगाडी बनविण्याला पसंती दिली. वर्षभर वापरलेली लाकडी बैलगाडी वर्षाअखेर प्रत्येक शेतकऱ्याला सुताराकडून दुरुस्त करून घ्यावी लागत असे. चाकेही लाकडी असल्याने कधी-कधी माल वाहतूक करताना मोडत असे. त्या लाकडी चाकांवर लोखंडी येटपट्टा लावण्याचे काम लोहार करीत असत.
लाकडी बैलगाड्यांच्या दुरुस्तीबाबत होत असलेली डोकेदुखी संपावी म्हणून शेतकरी आता लोखंडी बैलगाडीकडे वळू लागले आहे. आता बैलगाडीचे लाकडी कलाकुसरीचे पारंपरिक रूप बदलले असून शेतकरीवर्ग लोखंडी बैलगाडीला अधिक पसंती देत आहे. मशागतीसह मालवाहतुकीकरिता ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असला तरी शेतात जाणारे अरुंद रस्ते, वसाहतीमधील अंतर्गत लहान रस्ते तसेच पावसाळ््यात होणाऱ्या चिखलातून आजही माल वाहतुकीसाठी बैलगाडीच कामी येते. सध्या मोठया संख्येने शेतकरी वेल्डींग वर्कशॉपवरून लोखंडी बैलगाड्या बनवून घेत असल्याचे ग्रामीण भागात दिसून येते. लाकडी बैलगाड्या बनविणे बंद केल्याने सुतारांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे. लाकडी बैलगाडी आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. (शहर प्रतिनिधी)