लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षाचा एमबीबीएस विद्यार्थी आवेशकुमार याने विभागप्रमुख यांच्या त्रासाला व अपमानास्पद वागणुकीला कंटाळून ११ ऑगस्ट रोजी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याची माहिती त्याच्या आई-वडिलांना कळताच त्यांनी मंगळवारी (दि. १२) संध्याकाळी गोंदिया येथे पोहोचत अधिष्ठात्यांनी गठीत केलेल्या चौकशी समितीला मुलाचा प्रवेश राजस्थान येथील मेडिकल कॉलेजमध्ये करून देण्याची विनंती केली, तसेच संबंधित विभागप्रमुखाला बडतर्फ करावे, अशी मागणी केली.
आवेशकुमारचे वडील बलराम यांनी समितीकडे दिलेल्या तक्रारीत विभागप्रमुख प्राध्यापकाने वर्गात माझ्या मुलाचा अश्लील शब्दांत बोलून अपमान केला, परीक्षा न घेणे, धमक्या देणे आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. विभागप्रमुखाने सातत्याने मानसिक छळ, अपमानास्पद वक्तव्ये आणि शैक्षणिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांच्या वडिलांनी केला आहे. याच मानसिक त्रासामुळे आवेशकुमारने ११ ऑगस्ट रोजी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. मित्र वेळीच धातून गेल्याने त्याचा जीव वाचल्याचे त्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दीड महिन्यांपासून छळ सुरू असल्याचा आरोप ?आवेशकुमारचे वडील बलराम यांनी केलेल्या तक्रारीत त्यांच्या मुलाला एका शैक्षणिक पोस्टिंगसाठी अनुपस्थित राहिल्याबद्दल विभाग प्रमुखाने वर्गातील विद्यार्थ्यांसमोर शिवीगाळ केली, तसेच त्याच्या आईबद्दल अत्यंत अश्लील व अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे त्याचे मानसिक संतुलन ढासळले. गेल्या दीड महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. विद्यार्थ्यांच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला नाही, त्याला वारंवार अपमानित केले, पोस्ट एंड परीक्षा घेतली नाही आणि 'तुला तिसऱ्या वर्षाची परीक्षा द्यायची परवानगी देणार नाही', अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.
आवेशकुमारची प्रकृती धोक्याबाहेरआत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आवेशकुमारची प्रकृती सथ्या धोक्याबाहेर असून, त्याच्यावर सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.