लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षाला असलेल्या एका एमबीबीएस विद्यार्थ्याने प्राध्यापकाकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील भाड्याच्या खोलीत रविवारी मध्यरात्रीनंतर १:३० ते २ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
आवेश कुमार (२२, रा. भरतनगर, राजस्थान), असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सिव्हिल लाइन्स परिसरात शीतला माता मंदिर चौकात आवेश भाड्याने खोली घेऊन राहत होता. याच खोलीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हाताने लिहिलेली चिठ्ठी पोस्ट करत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
वारंवार तक्रार करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्याने नमूद केले आहे. "मी स्वतः रुग्ण असून सहानुभूतीची अपेक्षा होती, मात्र मला अपमानास्पद वागणूक मिळाली. मी चूक केली, पण ती इतकी मोठी नव्हती की त्यासाठी माझ्या आई व कुटुंबाबद्दल नको ते बोलावे," असे त्यात लिहिले असून, संबंधित वर्तनाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. या चिठ्ठीत त्याने एका प्राध्यापकाच्या नावाचाही उल्लेख केला आहे.
आवेशचा हा व्हाट्सअॅप मॅसेज व्हायरल होताच त्याच्या वर्गमित्रांनी त्याच्या खोलीवर धाव घेत त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेतून काढून उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
चौकशी समितीत यांचा समावेशया प्रकरणानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने चार सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीत डॉ. अपूर्व पावडे, डॉ. व्ही. पी. रूखमोडे, डॉ. स्नेहा व वॉर्डन मनू शर्मा आर्दीचा समावेश आहे.
वसतिगृहात प्रवेश, मग भाड्याने खोली का ?
- आवेश कुमार याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश घेतला असताना त्याने शीतला माता मंदिर परिसरात भाड्याने खोली का घेतली होती.
- तो कधी वसतिगृहात तर कधी भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती पुढे आली आहे.
- हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असताना या प्रकरणाची माहिती कुणालाच नसणे, ही बाब आश्चर्यकारक आहे.
"वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. चौकशी समितीही नेमली आहे."- डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया