त्या माऊलीचे बाळ औटघटकेचेच ठरले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:58+5:302021-01-13T05:16:58+5:30
संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : मातृत्वाचा आनंद आगळावेगळाच असतो. दोन वर्षांनी तर घरात पहिले बाळ येणार होते. आजाेबा-आजीचे डोळे ...

त्या माऊलीचे बाळ औटघटकेचेच ठरले ()
संतोष बुकावन
अर्जुनी मोरगाव : मातृत्वाचा आनंद आगळावेगळाच असतो. दोन वर्षांनी तर घरात पहिले बाळ येणार होते. आजाेबा-आजीचे डोळे बाळाला बघण्यासाठी आसुसलेले होते. तिचा पदस्पर्श घराला शिवलासुद्धा नव्हता. तोच नियतीने घात केला. काय पाप केले होते त्या निष्पाप बाळाने. गावच्या ग्रामीण रुग्णालयात सोयीसुविधा असत्या तर बाळ गमवावेच लागले नसते... अशा संतापजनक भावना भंडारा अग्निकांडात बाळ गमावलेल्या एका जन्मदात्यांनी व्यक्त केल्या.
भंडारा येथील अग्निकांडाने सारा देश हळहळला. समाजमन सुन्न झाले. या दुर्घटनेत ज्यांनी आपले बाळ गमावले त्यांचे दुःख भरून निघण्यासारखे नाही,पण प्रशासन चौकशीच्या नावावर पाठराखण करत आहे. आरोग्य प्रशासनाचे धिंडवडे देशासमोर आले. मोरगावच्या सुषमा भंडारी यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोन वर्षांनी घरात पहिल्यांदाच पाळणा हलणार होता. तिच्या मातृत्वाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पहिल्या मातृत्वाचे रंगविलेले स्वप्न ८ जानेवारीला रात्री ८:४० वाजता पूर्ण झाले. अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात कन्यारत्न झाले. नॉर्मल प्रसूती झाली. मात्र बाळाने आईच्या पोटात शौच केली होती. बाळ अशक्त होते. बाळ जन्माला आल्यानंतर पाच मिनिटे रडलेच नाही. डॉक्टरांनी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात रेफर केले. रात्री १२ वाजता भंडाऱ्याच्या सामान्य रुग्णालयातील विशेष नवजात शिशू केंद्रात बाळ दाखल झालं. जेमतेम दोन तास झाले. निद्रावस्थेत असताना रात्रीच्या दोन वाजता रुग्णालयाला आग लागल्याचे कुणीतरी ओरडले. धूर बघताच अवसान गळाले. कसेतरी सावरत शिशू केंद्राच्या द्वाराजवळ पोहोचलो. दाराची कडी बंद होती. परिचारिकेने आत जाण्यास मनाई केली. धूरच धूर पसरला होता. संपूर्ण रुग्णालय रिकामे करण्यास सांगण्यात आले. शनिवारी सकाळी ८ वाजता तुमचे बाळ दगावल्याचे सांगण्यात आले. अवघ्या दोन तासात होत्याचे नव्हते झाले, अशी संतप्त प्रतिक्रिया भंडारी दांपत्याने दिली.
तर बाळ गेलेच नसते...
अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात सोयीसुविधा नाहीत. डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. साध्या साध्या उपचारासाठी रुग्णांना गोंदिया, भंडाऱ्याला रेफर केले जाते. तालुकास्तरावरील रुग्णालयाची अशी दशा आहे. रुग्णालयात सोयीसुविधा असत्या तर आमचे बाळ गेलेच नसते. आमच्यासोबत जे घडले ते इतरांशी घडू नये. ग्रामीण रुग्णालये सर्व सुविधायुक्त असावीत, अशी प्रतिक्रिया भंडारी दाम्पत्याने व्यक्त केली.