तेंदूपाने संकलनातून अनेकांना मिळणार रोजगार
By Admin | Updated: April 1, 2015 00:48 IST2015-04-01T00:48:42+5:302015-04-01T00:48:42+5:30
जिल्ह्यात जंगले मोठ्या प्रमाणात असून वनसंपदासुद्धा भरपूर प्रमाणात आहे. उन्हाळा आला की जिल्ह्यातील अनेकांना तेंदूपाने संकलनातून रोजगार प्राप्त होतो.

तेंदूपाने संकलनातून अनेकांना मिळणार रोजगार
गोंदिया : जिल्ह्यात जंगले मोठ्या प्रमाणात असून वनसंपदासुद्धा भरपूर प्रमाणात आहे. उन्हाळा आला की जिल्ह्यातील अनेकांना तेंदूपाने संकलनातून रोजगार प्राप्त होतो. यंदा २७ कंत्राटदारांना तेंदूपाने संकलनाचा परवाना मिळाल्याने अनेक मजुरांना यातून रोजगार मिळणार आहे.
जिल्ह्यात तेंदूपाने संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात होते. तेंदूपाने संकलन करणाऱ्या मजुरांच्या कामावर गदा येवू नये यासाठी शासनसुद्धा प्रयत्नशील असते. जंगलात वनवा लागू नये, तेंदूपाने नष्ट होवू नये यासाठी वन विभागाकडून जनजागृती अभियान राबविण्यात येते. वन विभागाकडून करण्यात येणाऱ्या तेंदूपाने संकलनातून वन विभागाला नऊ कोटी ५० लाख रूपयांचा महसूल प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे कामासाठी ४६ हजार ग्रामस्थांना वनालगत दुर्गम भागात मे महिन्यातील उन्हाळ्याच्या काळात रोजगार उपलब्ध होणार आहे.
वन विभागातर्फे तेंदू संकलनासाठी सन २०१५ मध्ये तेंदूपाने घटकांची ई-निविदा मागविण्यात आली. परवाना मिळविण्यासाठी २९ कंत्राटदारांनी निविदा सादर केली. यापैकी २७ कंत्राटदारांना परवाना प्राप्त झाल्याची माहिती आहे. या कामातून मजुरांना मिळणाऱ्या रकमेशिवाय शासनाला प्राप्त होणाऱ्या महसुलातून व्यवस्थापनाचा खर्च वजा करण्यात येणार आहे. त्यातून शिल्लक महसुलाची रक्कम शासनाच्या निर्धारित धोरणानुसार वितरित करण्यात येणार आहे. बोनसचे वितरण पारदर्शक होण्यासाठी जन-धन योजनेंतर्गत बँकेत बचत खाते उघडण्यासाठी प्रोत्साहनसुद्धा देण्यात येत आहे.