गरिबांच्या अन्नावर अनेक जण होताहेत मालामाल
By Admin | Updated: August 5, 2014 23:31 IST2014-08-05T23:31:37+5:302014-08-05T23:31:37+5:30
गोरगरीब नागरिक अर्धपोटी राहू नये यासाठी शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत अल्पदरात धान्य देण्याची योजना अस्तित्वात आणली. मात्र गोरगरीबांच्या या अन्नधान्याची खरेदी

गरिबांच्या अन्नावर अनेक जण होताहेत मालामाल
गोंदिया : गोरगरीब नागरिक अर्धपोटी राहू नये यासाठी शासनाने सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत अल्पदरात धान्य देण्याची योजना अस्तित्वात आणली. मात्र गोरगरीबांच्या या अन्नधान्याची खरेदी करून स्वत: मालामाल होणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय झाले आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत स्वस्त धान्य दुकानांमार्फत दारिद्र्य रेषेखालील लोकांना अल्पदराने अन्नधान्य पुरविले जाते. विविध क्लृप्त्यांचा वापर करून हे अन्नधान्य पळविणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे. या रॅकेटमध्ये धनदांडगे व्यापारी असल्याचे बोलल्या जात आहे. आदिवासी, ग्रामीण भागातील जनता अशा रॅकेटच्या प्रलोभनाला बळी पडत आहेत. या कामासाठी धनदांडग्या व्यापाऱ्यांनी पगार अथवा कमिशनवर दलालांची नेमणूक केली आहे. हे दलाल ग्रामीण भागात स्वस्त धान्य संकलनाचे काम करतात. प्रत्येक दलालाचे नित्याचे ग्राहक ठरलेले आहेत. या दलालांमार्फत प्रत्येक महिन्याच्या १ ते १५ तारखेपर्यंत खेड्यापाड्यात हा गोरखधंदा चालतो. दारिद्र्यरेषेखालील कुटूंब, अंत्योदय व अन्नपूर्णा व अन्न सुरक्षा योजनेतील सुमारे ५० टक्के लाभार्थी या आमिषाला बळी पडत असल्याचे सांगण्यात येते.
या योजनेंतर्गत लाभार्थ्याला प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या रेशनची बाजारभावापेक्षा कमी किंमत लावून रेशनची ग्राहकाला उचल न करू देता काही स्वस्त धान्य दुकानदार रोखीने पैसे देतात. लाभ मिळणारा वर्ग गरीब असतो. त्यांच्याजवळ रेशन खरेदीसाठी वेळेवर पैसे उपलब्ध नसतात. धान्याची गरज असल्याने ते स्वस्त धान्य दुकानदारांशी संगणमत करतात. बाजारभावापेक्षा कमी दराने त्याला मिळणाऱ्या धान्याची किंमत लावली जाते. ग्राहकाला मिळणारे सवलतीचे दर व दुकानदाराने ठरविलेली किंमत यामधील तफावतीच्या रकमेचे धान्य त्या ग्राहकाला दिले जाते.
घरातील पैशाचा वापर न करता तो ग्राहक अर्धे धान्य खरेदी करतो व अर्धे धान्य दुकानदाराच्या घशात जाते, असा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. धान्य खरेदी करणारे दलाल ग्राहकाला स्वस्त धान्य दुकानदारांकडे घेऊन जातात. दुकानदारासमक्ष त्या ग्राहकाला त्याला मिळणाऱ्या दोन ते तीन महिन्याच्या धान्याची किंमत लावून ग्राहकाला रोखीने पैसे दिले जातात. कालांतराने दलाल हा या धान्याची थेट दुकानदाराकडून उचल करतो. या पद्धतीने आर्थिक अडचणीत असलेल्या ग्राहकांना हेरून दलाल त्यांची गरज भागवितात.
अनेक दलालांनी या क्लृप्त्यांचा वापर करून आदिवासी, नक्षलग्रस्त ग्रामीण भागात बस्तान मांडले आहे. खरेदी केलेल्या धान्याची साठवणूक करण्यासाठी भाड्याचे घरसुद्धा घेतले असल्याच्या चर्चा आहेत. दलाल हे साठवून ठेवलेले धान्य मालवाहू वाहनातून व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानापर्यंत पोहोचवितात.
व्यापारी हे बहुधा राईसमिल मालक असतात किंवा दलालांमार्फत ते धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचविले जाते. रेशनचे धान्य साफसफाई करून बाजारभावाच्या किमतीने बाजारात सुद्धा विकले जाते.
हल्ली निकृष्ट दर्जाचे धान्य उच्च दर्जाचे बनविणारे यंत्र बाजारात उपलब्ध आहेत. या यंत्राद्वारे खरेदी केलेल्या धान्यावर प्रक्रिया केली जाते. नंतर अधिकच्या किमतीने खुल्या बाजारात त्याची विक्री होते किंवा व्यापारी हाच तांदूळ लेव्हीच्या स्वरुपात शासनाला देतात.
एकंदरित शासनाचा माल शासनालाच अधिकच्या दराने पुरविला जातो. एकदा उपयोगात आणलेला माल पुन्हा नव्याने पहिल्यासारखा उपयोगात यावा म्हणून प्रक्रिया (रिसायकलिंग) केली जाते. याचपद्धतीने केरोसिनचा सुद्धा व्यापार चालतो. केरोसिन विक्रेतेसुद्धा सर्वसामान्य नागरिक नाहीत. त्यांची गोरगरीबांवर आधीच जरब असते. याचा लाभ घेत ते केरोसीन वेळेवर न देणे, प्रमाण कमी देणे, असले प्रकार करतात. ग्रामीण भागात केरोसिनचा घरगुती वापर कमी होतो. थोडेफार जागरुक नागरिक केरोसीन सवलतीच्या दराने विकत घेतात व या दलालांना जादा दराने विक्री करतात.
यात केरोसिनचा गैरवापर होतो. डिजेलचे दर वाढल्यामुळे चक्क ट्रक व ट्रॅक्टर्समध्ये केरोसिनचा वापर होत आहे. केरोसिनच्या या काळाबाजारामुळे अनेक व्यापारी मालामाल झाले आहेत. संबंधित विभागांना हप्ता मिळत असल्याने ते सुद्धा मूग गिळून गप्प आहेत. आर्थिक चणचण असल्यामुळे अनेक ग्राहक केरोसिनची मात्रा कमी प्रमाणात विकत घेतात. ग्राहकाला महिन्याकाठी मिळणाऱ्या संपूर्ण केरोसिनची विक्री होत असते. (तालुका प्रतिनिधी)