शेतकऱ्यांना दिल्या शेती विकासाचा मुलमंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:25+5:30
सभेत मोहाडीकर यांनी, शेतकरी मित्रांना फेरोमोन ट्रॅपचा वापर सद्यस्थितीत भात नर्सरीमध्ये केल्यास खोडकिड नियंत्रण करण्यास मदत होईल. तसेच यापासून होणारे फायदे आणि खर्चात कशाप्रकारे बचत करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांना दिल्या शेती विकासाचा मुलमंत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील शेतकरी मित्रांची सभा शुक्रवारी (दि.२६) घेण्यात आली.
अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी के.एन.मोहाडीकर होते. याप्रसंगी तंत्रज्ञान व्यवस्थापक उमेश सोनेवाने व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी उपस्थित होते.
सभेत मोहाडीकर यांनी, शेतकरी मित्रांना फेरोमोन ट्रॅपचा वापर सद्यस्थितीत भात नर्सरीमध्ये केल्यास खोडकिड नियंत्रण करण्यास मदत होईल. तसेच यापासून होणारे फायदे आणि खर्चात कशाप्रकारे बचत करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी तालुक्यातील आत्मांतर्गत नोंदणीकृत शेतकरी गटामार्फत निविष्ठा मागणी करून निविष्ठा खरेदी करावी याविषयी माहिती दिली. सोनेवाने यांनी,फेरोमोन ट्रॅप प्रत्यक्षरित्या दाखवून ट्रॅप मध्ये लुर कसे बसवितात व त्यांना शेतात कसे लावायचे याविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच कृषी मित्रांचे कार्य आणि जबाबदारी समजावून सांगितली. तसेच श्री व पट्टा पद्धताविषयी मार्गदर्शन केले.
उपवंशी यांनी, भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना व सगुना भात लागवड पद्धत याविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच सगुना भात लागवड पद्धतीचे युट्यूबद्वारे चित्रफित दाखिवण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाविषयी प्रचार-प्रसिद्धी करावी याबाबत सूचना देण्यात आल्या.
सभेला कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक फटिंग, सलामे, बावनकर तसेच तालुक्यातील शेतकरी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.