मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर मलेरियाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:47 IST2017-08-30T21:46:57+5:302017-08-30T21:47:36+5:30
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीचे बांधकाम अद्यापही सुरू झाले नाही.

मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर मलेरियाचे संकट
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीचे बांधकाम अद्यापही सुरू झाले नाही. परिणामी मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय वसतिगृह म्हणून कारंजा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत केली. मात्र या इमारतीच्या परिसरात गवत आणि केरकचरा असल्याने वसतिगृहातील भावी डॉक्टरांनाच मलेरियाची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय व केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय (वसतिगृह) कारंजा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत करण्यात आली आहे. पण, इमारतीच्या आजू-बाजूला सर्वत्र झाडे-झुडुपे, गवत, कचरा वाढला आहे. या परिसरात केरकचरा आणि घाणीचे साम्राज्य असल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी नवीन खाटा, गाद्या आल्या आहेत. या इमारतीच्या अनेक खिडक्यांमधील काचा फुटल्याने डास खिडक्यांमधून डास आत प्रवेश करतात.
विद्यार्थ्यासाठी मच्छरदाण्या नाहीत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी आकारले जाणारे शुल्क देखील भरतात. मात्र यानंतरही त्यांना सोयीसुविधा देण्याकडे आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करित असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्याच्या हिवताप रूग्णांच्या संख्येत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थीची भर तर पडणार नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. मंगळवारपासून मेडिकल कॉऊन्सिलची चमू वैद्यकीय महाद्यालयाची पाहणी करण्यासाठी आली असल्याने वसतिगृहात स्वच्छता दिसून आली. परंतु काही नळांना पाणी येत नव्हते. गणेशोत्सव व सलग चार दिवस सुट्टी असल्याने या वसतिगृहातील विद्यार्थी चार दिवसासाठी गावाला गेले आहे.मात्र मेडिकल कॉन्सिलची चमू येणार असल्याचा सुगावा आधीच प्रशासनाला लागल्याने त्यांनी वसतिगृहाचा परिसर चकाचक करुन ठेवल्याचे बोलले जाते. दरम्यान पाहणीसाठी आलेली चमू यासर्व गोष्टींची दखल घेणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रजेगाव ग्रामीण रुग्णालयाची पाहणी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दौºयावर आलेली मेडिकल कॉऊन्सिल आॅफ इंडियाची चमू बुधवारी रजेगावच्या ग्रामीण रूग्णालयात पोहचली. रजेगावच्या ग्रामीण रूग्णालयात भविष्यात डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ५ वर्षाचे एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर रजेगाव येथील प्रशिक्षण केंद्रात पाठविले जाणार आहे. त्याच अनुषंगाने चमू येथील सोयी सुविधांचा आढावा घेतल्याची माहिती आहे.