तालुक्यात नऊपैकी सात ग्रामपंचायतवर महिलाराज
By Admin | Updated: August 7, 2015 01:39 IST2015-08-07T01:39:57+5:302015-08-07T01:39:57+5:30
तालुक्यात एकूण नऊ ग्रामपंचायतीमध्ये ४ आॅगस्ट रोजी सरपंच-उपसरपंच पदांची निवडणूक झाली.

तालुक्यात नऊपैकी सात ग्रामपंचायतवर महिलाराज
एका ठिकाणी राकाँ : पाच काँग्रेस तर तीनमध्ये भाजप
विजय मानकर सालेकसा
तालुक्यात एकूण नऊ ग्रामपंचायतीमध्ये ४ आॅगस्ट रोजी सरपंच-उपसरपंच पदांची निवडणूक झाली. यात सात ठिकाणी महिलांनी सरपंचपद काबिज केले. विशेष म्हणजे नऊपैकी केवळ चार ठिकाणी महिलांसाठी सरपंचपद आरक्षित होते. परंतु इतर तीन ठिकाणीसुद्धा महिलांनी पुरूषांना मागे ठेवून ग्रामपंचायतींवर कब्जा केला आहे.
पुरूषांनी सर्व हतकंडे आजमावूनही त्यांना दारून पराभव पत्कारावा लागला. या सर्व प्रकारामुळे महिलांमध्ये निर्णय क्षमता वाढली असून त्या आता पुरूषांवर अवलंबून राहणे पसंत करीत नसल्याचेच दिसून येते.
तालुक्यातील एकूण ४१ ग्रामपंचायतींपैकी यावर्षी नऊ ग्रामपंचायतींमध्ये कार्यकाळ संपल्यावर सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेस, भाजप, राकॉ व शिवसेना समर्थकांनी आपापल्या सोयीनुसार पॅनल तयार करून निवडणूक लढविली. यात सदस्य निवडूण येण्यात सर्वच मुख्य पक्षांना समिश्र प्रतिसाद मिळाला. परंतु सरपंच निवडणुकीत नऊपैकी काँग्रेसने पाच, भाजपचे तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका ग्रामपंचायतवर आपला सरपंच बनविण्यात यश आले.
कोटजमुरा येथे सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. येथे बबीता विजय मेश्राम काँग्रेसकडून अर्ज केला. त्यांनी छाया बोरकर यांचा पराभव करीत सरपंच पद मिळविले. मुंडीपार येथे किरण महेश वाघमारे सरपंच बनल्या. पाऊलदौना ग्रामपंचायतमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने तेथे भाजपचे अरूणकुमार श्यामप्रकास टेंभरे सरपंच तर दिनेश दमाहे उपसरपंच बनले. मानागड येथे काँग्रेसचे भोजराज इंदल सयाम सरपंच तर सुरेखा सुरीतलाल मडावी उपसरपंच बनल्या. कोटरा ग्रामपंचायतवर काँग्रेसच्या मीरा ओमप्रकाश नाईक सरपंच तर संतोष तुळशीराम चुटे उपसरपंच बनले. सातगाव येथील ग्रामपंचायतवर भाजपला बहुमत असले तरी येथे सरपंच पद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असून येथे काँग्रेसच्या संगीता संजय कुसराम या एकमेव उमेदवार अविरोध सरपंच बनल्या. तर भाजपचे पृथ्वीराज शिवणकर उपसरपंच बनले.
२५ जुलै रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल २६ जुलै रोजी लागल्यापासून सरपंच-उपसरपंच कोण बनणार? याबाबत चर्चा सुरू होती. निवडून आलेल्या सदस्यांना खरेदी करणे, त्यांना सहलीवर नेणे इत्यादी प्रकरण घडत राहिले.
परंतु या वेळी जवळपास सर्व ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या सद्विवेकाने सरपंच निवडणुकीत भाग घेताना दिसले.
पद आरक्षित नसतानाही महिल्या झाल्या सरपंच
कावराबांध ग्रामपंचायतवर भाजपच्या मंजूलता पोषण बनोठे यांनी काँग्रेसचे गजानन मोहारे यांचे सरपंच बनण्याचे स्वप्न भंग करीत त्यांचा पराभव करून सरपंच बनल्या. पोवारीटोला ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा किशोर नागपुरे यांनी काँग्रेसचे चंद्रशेखर दमाहे यांचा पराभव करीत सरपंचपद काबिज केले. या दोन्ही ठिकाणी महिला आरक्षण नसूनसुद्धा महिलांना सरपंच बनण्यात यश आले.