माहेरची वाट कोरोनामुळे झाली दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:28 IST2021-05-14T04:28:39+5:302021-05-14T04:28:39+5:30

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी, जिल्हाबंदी आदी उपाययोजना सुरू केल्या आहेत. चांगला प्रतिसादसुद्धा ...

Maher waited for Corona to go away | माहेरची वाट कोरोनामुळे झाली दूर

माहेरची वाट कोरोनामुळे झाली दूर

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी, जिल्हाबंदी आदी उपाययोजना सुरू केल्या आहेत. चांगला प्रतिसादसुद्धा मिळत आहे. नवविवाहित मुलींना आपले माहेर दुरावल्याची खंत मनात सारखी बोचत आहे.

लॉकडाऊन कालावधीतही लग्नसोहळे पार पडत आहेत. एकदा लग्न लावून गेलेली मुलगी परतीला न येता सासरी रममाण होण्याची पाळी आली आहे. लग्न झाल्यावर मुली किमान दोन ते तीन वेळा माहेरी येत असतात. मात्र, जिल्हाबंदी असल्याने त्यांना येणे शक्य नाही. उन्हाळी सुट्टीत मुलांना शाळा नसते. अशात चार दिवस माहेरी जाऊन तेथील वातावरणात रममाण होण्याची मनोमन इच्छा सुहासिनींना असते. मात्र, कोरोनाने माहेरची वाट दूर गेली आहे. सध्या विवाहित मुली आपल्या माहेरातील आई, वडील व इतर मंडळींशी मोबाइलने आभासी भेट घडवून आणतात. यात कधी व्हिडीओ कॉल करून माहेरातील आठवणीला उजाळा देत आहेत. प्रत्येक विवाहित मुलीला आपल्या माहेरची आठवण येणे साहजिकच आहे. अशातच कोरोनामुळे माहेरातील पाहुणचारालासुद्धा मुकावे लागले आहे. लग्नसोहळ्यांसाठी केवळ २५ जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. माहेरी होणाऱ्या आप्तस्वकीयांच्या लग्नसोहळ्यातही उपस्थिती दर्शविणे कठीण झाले आहे. तसेच अंत्यविधीसाठीसुध्दा उपस्थितीची अट घालून दिली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी जाणे अवघड जात आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी संकटाने जीव कासावीस झाला आहे. नातेवाइकांच्या उन्हाळी भेटीवर विरजण पडले आहे. केव्हा लॉकडाऊन मोकळे होईल व कधी माहेरी जाईन, याची ओढ लागली आहे. सुहासिनींना कोरोनामुळे माहेरी जाता येत नसल्याने त्यांना माहेरची आता ओढ लागली असली तरी आभासी भेटीवरच समाधान मानावे लागत आहे.

Web Title: Maher waited for Corona to go away