कृषी संजीवनीला महावितरणचा खो
By Admin | Updated: August 8, 2015 01:59 IST2015-08-08T01:59:20+5:302015-08-08T01:59:20+5:30
मीटर चोरी गेल्यावर वीज वितरण कंपनीने तिथे फॉल्टी मीटर लावून चुकीची बिले दिली.

कृषी संजीवनीला महावितरणचा खो
ग्राहक न्यायमंचचा निवाडा : नुकसान भरपाई देण्याचे आदेश
गोंदिया : मीटर चोरी गेल्यावर वीज वितरण कंपनीने तिथे फॉल्टी मीटर लावून चुकीची बिले दिली. त्या अर्ध्याअधिक बिलांची रक्कम भरूनही वीज कंपनीने जोडणी कापली. तसेच कृषी संजीवनी योजनेचा लाभही शेतकऱ्याला दिला नाही. याप्रकरणी शेतकऱ्याच्या बाजुने निकाल देऊन जिल्हा ग्राहक न्यायमंचाने वीज वितरण कंपनीला वीज जोडणी पूर्ववत करून देण्यासोबतच शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
गोंदिया तालुक्यातील आसोलीचे पूरणलाल सुखराम उके असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांचे वडील मरण पावल्यानंतर त्यांनी वीज जोडणीचे मीटर स्वत:च्या नावावर न करता बिल नियमित भरणे सुरू ठेवले. वडिलांच्या नावे असलेले मीटर सन २०११ मध्ये चोरी गेले. याची तक्रार त्यांनी वीज कंपनीकडे केली. मात्र कंपनीने कसलीही कार्यवाही केली नाही. काही काळानंतर त्या जागी बिघाड असलेले (फॉल्टी) मीटर लावण्यात आले. मीटर फॉल्टी असल्याचे लक्षात आल्यावर उके यांनी ३ आॅगस्ट २०१३ रोजी लेखी तक्रार दिली. मात्र वीज कंपनीने बिघाड दुरूस्त केला नाही मात्र फॉल्टी मीटरचे बिल पाठविणे बंद केले. तसेच जून २०१३ मध्ये वीज पुरवठा खंडित केला. मात्र नवीन मीटर बसवून दिले नाही.
उके यांनी याप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. वीज वितरण कंपनीच्या विभागीय अभियंत्यांनी आपला जबाब नोंदविताना वीज बिल चुकीचे असल्याचे नाकारले. तसेच तक्रारकर्त्याने बिलाचा भरणा केल्याची बाब खोटी असल्याचे नमूद केले. मात्र तक्रारकर्त्याने आपल्या शपथपत्रात सर्वच कागदपत्रे सादर केली होती.
तक्रारकर्ते उके यांच्या बाजूने अॅड.एस.के. गडपायले यांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी उके यांनी नवीन मीटर लावण्यासाठी अर्ज केला असताना वीज कंपनीने दुर्लक्ष केले व पूर्वसूचना न देता वीज जोडणी कापली. तसेच फॉल्टी मीटरचे बिल पाठविणे सुरूच ठेवले. त्यामुळे ग्राहकाचे दोन लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले. वीज कंपनीकडून अॅड.एस.बी. राजनकर यांनी युक्तिवाद केला. त्यात थकीत बिल न भरल्यामुळे जोडणी कापली. तसेच ग्राहक उके हे ‘हॅबिच्युअल डिफॉल्टर’ असून कृषी संजीवनी योजना त्यांना लागू होत नसल्याचे म्हटले.
यावर ग्राहक न्यायमंचाने कारणमिमांसा केली. त्यात वडिलांच्या नावावर असलेल्या मीटरचे बिल मुलगा भरत होता. त्यांच्या कुटुंबाची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. मीटर वडिलांच्या नावे असल्याने ते लाभार्थी आहे. फॉल्टी मीटरबाबत लेखी तक्रार करूनही कंपनीने काहीही कार्यवाही न करता वारंवार वीज बिल वाढवून पाठविण्यात येत होते. कृषी संजीवनी योजनेंतर्गतही ग्राहकाने बिल भरले. मात्र त्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात आला नाही. वीज जोडणी खंडित करताना त्यांना कायदेशीर नोटीस देण्यात आली नाही, ही सेवेतील त्रुटी असल्याचे मत न्यायमंचाचे मत झाले.
न्यायमंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी ग्राहक उके यांची तक्रार अंशत: मान्य केली. तसेच त्यांचे संपूर्ण थकीत बिल कृषी संजीवणी योजनेंतर्गत नियमित करून जास्तीची रक्कम पुढील वीज बिलात समाविष्ट करावी व त्याचा संपूर्ण तपशील त्यांना द्यावा, वीज पुरवठा पूर्ववत करावा. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून पाच हजार रूपये द्यावे, तसेच तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार रूपये ३० दिवसांच्या आता द्यावे, असा आदेश वीज वितरण कंपनीला दिला. (प्रतिनिधी)