महावितरण कंपनीला ग्राहक मंचने दिला ‘शॉक’
By Admin | Updated: December 23, 2014 23:05 IST2014-12-23T23:05:35+5:302014-12-23T23:05:35+5:30
घरगुती वीज ग्राहकाला व्यावसायिक दराने ६७ हजारांचे वीज बिल देणाऱ्या महावितरणला ग्राहक मंचने ‘शॉक’ देत ते बिल रद्द केले. तसेच तक्रारकर्त्याने भरलेली ३४ हजारांची रक्कम पुढील

महावितरण कंपनीला ग्राहक मंचने दिला ‘शॉक’
चुकीचे देयक : घरगुती मीटरसाठी आकारला व्यावसायिक दर
गोंदिया : घरगुती वीज ग्राहकाला व्यावसायिक दराने ६७ हजारांचे वीज बिल देणाऱ्या महावितरणला ग्राहक मंचने ‘शॉक’ देत ते बिल रद्द केले. तसेच तक्रारकर्त्याने भरलेली ३४ हजारांची रक्कम पुढील बिलात समायोजित करण्याचा आदेश दिला.
जसवंतसिंग रेलूमल परयानी रा. अन्सारी वार्ड, गोंदिया असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांनी रिकाम्या प्लॉटवर घर बांधकामासाठी विद्युत वितरण कंपनीला तात्पुरते वीज मीटर मागितले होते. त्यांना २ आॅक्टोबर २०१० रोजी घरगुती मीटर अनामत रक्कम दोन हजार रूपये भरल्यावर देण्यात आले होते. यानंतर विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांनी २८ फेब्रुवारी २०१२ रोजी परयानी यांच्या घरी धाड घातली असता घरगुती वापराची वीज जोडणी व्यावसायीक हेतूसाठी वापरत असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना एक लाख २९ हजार ९९२ रूपयांचे बिल देण्यात आले. सदर बिल फेब्रुवारी २०१३ मध्ये कमी करून ६७ हजार ९८६ रूपयांचे देण्यात आले. परंतु बिल न भरल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. यानंतर ग्राहक परयानी यांनी १५ मार्च २०१३ रोजी भारतीय स्टेट बँकेचा ३४ हजार रूपयांचा धनाकर्ष थकित बिलापोटी जमा केल्यावर वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतर त्यांना २० मार्च २०१३ रोजी उर्वरित ३६ हजार ९८६ रूपये सात दिवसांच्या आत भरण्याचे नोटीस विद्युत वितरण कंपनीने पाठविले. त्यामुळे त्यांनी वीज पुरवठा खंडित करू नये म्हणून अंतरिम आदेश मिळण्यासाठी ग्राहक न्यायमंचात अर्ज दाखल केला.
न्यायमंचाने २६ मार्च २०१३ रोजी अंतरिम अर्ज निकाली काढला. यात जानेवारी २०१३ च्या ६७ हजार ९८६ बिलापोटी १५ हजार रूपये ग्राहकाने तीन दिवसात विद्युत वितरण कंपनीकडे जमा करावे, पुढील आदेशापर्यंत वीज पुरवठा खंडित करून नये व पुढे येणारी विद्युत देयके नियमित भरावीत, असा आदेश पारित केला. एमएसईडीसीच्या कमर्शियल सर्कुलर-१७५ नुसार घरगुती ग्राहक दरमहिना ५०० युनिटच्या आत बांधकाम किंवा घरपरिसरात इतर कार्यासाठी वीज वापर करीत असेल तर घरगुती वीज मीटरनुसार दर आकारावे आणि जर तोच ५०० युनिटपेक्षा अधिक वीज वापर करीत असेल तर व्यावसायीक दर आकारावे, असे विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता (ग्रामीण) नावेद अख्तर शेख यांनी आपल्या प्रतिज्ञा पत्राच्या पुराव्यात म्हटले आहे.
ग्राहक परयानी यांनी दाखल केलेल्या डिसेंबर २०१२ च्या विद्युत बिलामध्ये एकूण वापर १४३ युनिट दर्शविले आहे. तसेच जानेवारी २०१३ च्या बिलामध्ये विद्युत वापर ३७४ युनिट दर्शविले आहे. त्यामुळे त्यांना लागणारे विद्युत वापराचे युनिट हे ५०० युनिटच्या आत आहे, हे या बिलावरून सिद्ध झाले. तसेच विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ग्राहक परयानी यांना ५०० युनिटच्या वर दरमहिना बिल येत होते, याबद्दलचा कसलाही पुरावा दाखल केले नाही. त्यामुळे परयानी यांनी स्वत:च्या कुटुंबाकरिता वापरलेले युनिट हे घरगुती प्रकारात मोडते व व्यावसायिक हेतूच्या प्रकारात मोडत नसल्याचे न्यायमंचाचे मत झाले.
परयानी यांना व्यायसायिक दरानुसार दिलेले जानेवारी २०१३ चे ६७ हजार ९८६ रकमेचे विद्युत देयक रद्द केले. तसेच परयानी यांनी विद्युत पुरवठा खंडित होवू नये यासाठी भरलेले ३४ हजार रूपये पुढे येणाऱ्या बिलामध्ये समायोजित करण्यात यावे, शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून ग्राहकाला १० हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये आदेशाची प्रत मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने विद्युत वितरण कंपनीला दिला. (प्रतिनिधी)