महात्मा गांधी तंटामुक्त कार्यालय ठरले शोभेची वास्तू
By Admin | Updated: May 11, 2014 23:51 IST2014-05-11T23:51:21+5:302014-05-11T23:51:21+5:30
गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची स्थापना केली.

महात्मा गांधी तंटामुक्त कार्यालय ठरले शोभेची वास्तू
एकोडी : गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची स्थापना केली. हा उपक्रम गावोगावी राबविण्यात यावा, यासाठी त्या-त्या गावातील लोकसंख्येच्या आधारावर पुरस्कार देण्यात आले. परंतु पुरस्कार देण्यात आलेल्या गावात आता फक्त अध्यक्षपदाकरिता चढाओढ होत असल्याचे दिसून येते. एकदा अध्यक्ष झाले की ना तंटे सोडविण्यात येत आहे वा कोणत्याही सभेचे आयोजन करण्यात येत आहे. असाच प्रकार येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा झाला आहे. १५ आॅगस्ट २०१३ नंतर येथील ग्रामपंचायतने ग्रामसभेचे आयोजन करुन महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी राजेश मयाराम तायवाडे यांची निर्विरोध निवड करण्यात आली. समिती व ग्रामपंचायतकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. तंटामुक्त समितीसाठी स्वतंत्र कार्यालय तयार करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतने जवाहर रोजगार योजनेंतर्गत सन १९८३-८४ मध्ये बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीला तंटामुक्त समितीच्या कार्यालयाकरिता उपलब्ध करुन दिले. कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, उपविभागीय पोलीस अधीक्षक तिरोडा दीपक गिºहे व इतर मान्यवरांच्या उपस्थित २५ आॅक्टोबर २०१३ रोजी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्ह्यातील पहिले महात्मा गांधी तंटामुक्त कार्यालय तयार करण्यात आल्याचे वर्तमानपत्रातून प्रकाशित करवून घेण्यात आले. याबाबत वर्तमानपत्रामधून इतका प्रचार करण्यात आला की, जिल्ह्यातील बड्या नेत्यांना कार्यालयाला भेट देण्याकरिता पाचारणही करण्यात आले. त्यात प्रामुख्याने ना. प्रफुल्ल पटेल, राजेंद्र जैन, नाना पडोळे, अनेक जि.प. सदस्य व पंचायत समिती सदस्य, सभापती सरिता अंबुले या सर्वांनी भेटी दिल्या. परंतु हा सर्व प्रकार चर्चेत राहण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे दिसून येत आहे. कारण गावात ज्या उद्देशाने निर्विरोध निवड करून तायवाडे यांना निवडून आणले त्यांनी नियुक्तीनंतर वर्तमानपत्रातील प्रचार सोडून एकही तंटा सोडविण्याचे कार्य केले नाही. यामुळे येथील समिती आपल्या उद्देशांपासून भटकल्याचे दिसते. तर तंटामुक्त समिती अध्यक्षांचा कार्यकाळ केव्हा संपतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)