केवळ ‘लक्ष्या’शीच नाही तर तिथे पोहोचविणाऱ्या रस्त्यासोबतही प्रेम करा

By Admin | Updated: July 21, 2014 00:15 IST2014-07-21T00:15:11+5:302014-07-21T00:15:11+5:30

आपण केवळ दुसऱ्यांमधील चांगले गुण पाहून त्याची तारीफ करतो. पण त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करीत नाही. जीवनात काहीतरी करायचे असेल तर स्वत:मध्ये बदल करायला शिकले पाहीजे.

Love not only with 'Lakshya' but also along the road leading to it | केवळ ‘लक्ष्या’शीच नाही तर तिथे पोहोचविणाऱ्या रस्त्यासोबतही प्रेम करा

केवळ ‘लक्ष्या’शीच नाही तर तिथे पोहोचविणाऱ्या रस्त्यासोबतही प्रेम करा

गोंदिया : आपण केवळ दुसऱ्यांमधील चांगले गुण पाहून त्याची तारीफ करतो. पण त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करीत नाही. जीवनात काहीतरी करायचे असेल तर स्वत:मध्ये बदल करायला शिकले पाहीजे. जीवनात जे ध्येय ठवले आहे त्यावरच केवळ प्रेम करू नका, तर ते ध्येय गाठण्यासाठी जो रस्ता तुम्ही निवडाल त्याच्याशीही प्रेम करा, म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास चांगला होईल, असा सल्ला ‘लाईफ चेंगिंग’ कार्यशाळेचे प्रशिक्षक नदीम काझी यांनी दिला.
लोकमत युवा नेक्स्ट आणि बालविकास मंचच्या वतीने येथील धोटे बंधू महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेसाठी आलेल्या काझी यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जीवनात केवळ ‘विश्वासा’च्या जोरावर कोणतेही ध्येय कसे साध्य करता येते आणि त्यासाठी काय केले पाहीजे याचा पाट उलगडला.
अवघ्या २६ वर्षाच्या नदीम काझी यांचे मूळ गाव लातूर जिल्ह्यातील असले तरी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे घेतले. बीएससी आणि एमएससी (हॉर्टिकल्चर) मध्ये ते पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पण महाविद्यालयाची पायरी चढण्याआधीच त्यांनी गिनीज रेकॉर्ड करणारे विश्वरूपराय चौधरी यांच्या मेमरी कार्यशाळेत भाग घेतला आणि त्यातून ते खूप प्रभावित झाले. यातच आपणही करिअर करायचे आणि नवीन पिढीला हे ज्ञान द्यायचे असे ठरवून त्यांनी आत्मविश्वास, इच्छाशक्तीतून कोणतीही गोष्ट कशी साध्य करायची, मानसशास्त्र, स्मरणशक्तीचा उपयोग अशा विविध गोष्टींचे ज्ञान विविध माध्यमातून आत्मसात केले. हे ज्ञान केवळ आपल्यापुरते मर्यादित न राहता ते पुढील पिढीला मिळाले पाहीजे आणि यातून अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून यावा यासाठी त्यांनी कार्यशाळाही घेणे सुरू केले.
सध्या नदीम हे भारतीय सैन्यदलाच्या पुणे परिसरातील कॅम्पमध्ये जाऊन त्यांच्याही कार्यशाळेला मार्गदर्शन करतात. याशिवाय इतरही ठिकाणी त्यांच्या कार्यशाळा सुरू असतात. जीवनात साध्य करता येणार नाही असे काहीही नाही, केवळ स्वत:वर विश्वास असायला पाहीजे असे ते सांगतात. जीवनात पैशाने सर्वकाही मिळतेच असे नाही. जी गोष्ट पैशाने खरेदी केली जाऊ शकत नाही असे काहीतरी प्रत्येकाने कमावले पाहीजे. जीवनात वेगळे काही केल्याशिवाय नवीन काहीतरी साध्य होणारच नाही. माझा ईश्वरावर (अल्ला) विश्वास आहे. प्रार्थना करता आपल्या हातात काहीच नाही, सर्वकाही ईश्वरावर सोपवावे. पण प्रत्यक्ष काम करता सर्वकाही आपल्याच हातात आहे, आपण जे करू तसेच होणार, असा विश्वास ठेवून काम केल्यास निश्चितपणे यश लाभते, असे नदीम यांनी सांगितले.
लहान मुले जास्त क्रियाशिल असतात. कारण त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट नवीन असते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या कामात नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश केल्यास आपणास अधिक क्रियाशिल होता येते. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करताना किंवा ती साध्य करताना त्यात पूर्णपणे स्वत:ला गुंतवणे गरजेचे असते.
एका अभ्यासानुसार केवळ ऐकल्याने ३५ टक्के लक्षात राहते, लिहून काढल्याने ५० टक्के तर प्रत्यक्ष ती गोष्ट करून पाहील्याने ९५ टक्के लक्षात राहते असे नदीम यांनी सांगितले. जीवनात आपले ‘गोल’ (साध्य) निश्चित करा आणि त्यानुसार वाटचाल करा, प्रवासाला निघताना आपल्याकडे जिकडे जायचे आहे त्याच गाडीत बसतो. त्याप्रमाणे जीवनाच्या प्रवासात कुठे जायचे आहे हे ठरवून नंतरच प्रवास सुरू करा, असा सल्ला यावेळी नदीम काझी यांनी दिला. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Love not only with 'Lakshya' but also along the road leading to it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.