चान्ना आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा मुख्यालयाला खो
By Admin | Updated: March 8, 2015 01:17 IST2015-03-08T01:17:31+5:302015-03-08T01:17:31+5:30
चान्ना (बाक्टी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत आहे.

चान्ना आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा मुख्यालयाला खो
बोंडगावदेवी : चान्ना (बाक्टी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत आहे. कर्मचाऱ्यांच्या ये-जा प्रणालिने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. पीएचसीच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहून रुग्णांची सेवा करावी. मुख्यालयी न राहणारे डॉ. राजीव डोबे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी चान्ना येथील नरेश राखडे यांच्या नेतृत्वाखाली १५ युवकांनी केली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नाही असा आरोप चान्ना येथील युवा कार्यकर्त्यांनी केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी लाखो रुपये खर्च करून निवासाचे बांधकाम करण्यात आले आहे.
काही निवासस्थान आजतागायत रिकामेच आहेत. वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. राजीव डोबे मुख्यालयाच्या निवासस्थानात न राहता दुसऱ्या ठिकाणावरुन ये-जा करत असल्याने ग्रामीण भागील जनतेला आरोग्य सेवेचा पुरेपुर लाभ मिळत नाही. सदर आरोग्य केंद्रात योग्य पद्धतीने उपचार न होता रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा सल्ला वारंवार दिला जातो.
प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका आहे. रुग्णवाहिकेचा चालक सुटीवर गेला तर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था होत नाही. पर्यायाने रुग्णांना खासगी गाड्यांनी इतरत्र हलवावा लागतो असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
पीएचसी मधील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कधीकाळी रुग्णांना स्वत:चा जीव गमवावा लागतो. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यासाठी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे वरिष्ठांनी आदेश द्यावे, अशी मागणी चान्ना येथील नरेश राखडे, मिलिंद राखडे, संदीप शेंडे, सुरेश शेंडे, मेघन राखडे, लीलाधर कुंभरे, युवराज कुंभरे, कुलदेव कोरे, भाष्कर शिवणकर, अलंकार राखडे, दिपक राखडे, रवि राखडे, रवि हुमणे, दिनेश कावळे, राहुल शेंडे आदी युवा कार्यकर्त्यांनी केली आहे. (वार्ताहर)