पिक विमा योजनेला बँंकेचा खो
By Admin | Updated: July 17, 2014 00:10 IST2014-07-17T00:10:06+5:302014-07-17T00:10:06+5:30
केंद्र शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांना संरक्षण म्हणून आपदग्रस्त परिस्थितीत मोबदला मिळण्यासाठी पिक विमा योजना लागू केली. मात्र अग्रणी बँकेच्या कामचुकारपणामुळे

पिक विमा योजनेला बँंकेचा खो
गोरेगाव : केंद्र शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांना संरक्षण म्हणून आपदग्रस्त परिस्थितीत मोबदला मिळण्यासाठी पिक विमा योजना लागू केली. मात्र अग्रणी बँकेच्या कामचुकारपणामुळे सदर योजना रखडल्याचे चित्र गोरेगाव तालुक्यात आहे.
प्राप्त माहितीनुसार, केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना अंमलात आणली. सदर योजना ऐच्छिक व बिना ऐच्छिक स्वरुपाची असून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पिक कर्ज घेतले नाही त्यांच्याकरिता ऐच्छिक स्वरुपात असून त्याचा हप्ता प्रतिहेक्टर ३७५ रुपये राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेत भरण्याची सोय शासनाने करुन दिली आहे.
पीक विमा योजनेचा कृषी कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला आहे. मात्र अग्रणी बँकेच्या उदासीन धोरणामुळे पिक विमा योजनेपासून वंचित राहण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. अग्रणी बँकेने स्थानिक बँकांना पिक विमा योजनेविषयी कुठलीही सूचना न दिल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेतून आल्यापावली परतावे लागत आहे. या पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै २०१४ पर्यंत शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करावे असे शासनाचे आदेश आहे. या योजनेत ज्या शेतकऱ्यांना अतिरिक्त विमा संरक्षण पाहिजे त्या शेतकऱ्यांना अधिकचे पैसे भरुन लाभ मिळविता येईल. (तालुका प्रतिनिधी)