खाते उघडण्यासाठी ग्राहकांची लूट
By Admin | Updated: February 7, 2015 01:04 IST2015-02-07T01:04:19+5:302015-02-07T01:04:19+5:30
शासनाने प्रत्येक लोकोपयोगी योजनांच्या लाभासाठी राष्ट्रीयकृत बँकेतील खाते अनिवार्य केले आहे.

खाते उघडण्यासाठी ग्राहकांची लूट
केशोरी : शासनाने प्रत्येक लोकोपयोगी योजनांच्या लाभासाठी राष्ट्रीयकृत बँकेतील खाते अनिवार्य केले आहे. त्यासाठी विद्यार्थी, शेतकरी आणि गरजू व्यक्ति युनियन बँक आॅफ इंडिया शाखा तिबेटी कॅम्प गोठणगाव या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यासाठी जातात. तेव्हा नवीन खाते उघडण्याचे फार्म संपल्याचा देखावा निर्माण करून फार्मची किमत २०० रुपये घेण्याचा प्रकार सुरू केला असून बँकेत ग्राहकांची लूट सुरू आहे.
केशोरी परिसरासाठी राष्ट्रीयकृत बँक म्हणून युनियन बँक आॅफ इंडिया शाखा तिबेट कॅम्प गोठणगाव ही बँक शाखा जवळ पडते. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी व शेतमजूर मोठ्या प्रमाणात बँक खाते उघडण्यासाठी जात आहेत. या बँकेत कर्मचारी वर्ग कमी असल्याने वेळेवर कामे होत नाही. त्यासाठी अनेकदा बँकेत चकरा माराव्या लागतात. त्यातल्या त्यात येथे ठेवण्यात आलेल्या रोजंदारीवरील कर्मचारी व्यवस्थापकांच्या अनुपस्थितीत ग्राहकांशी असभ्य वर्तणूक करुन नवीन खाते उघडण्याचे फार्म संपल्याच्या नावावर नवीन खाते उघडण्याच्या फार्मसाठी २०० रुपये घेवून खातेदारांची लूट करीत आहेत.
यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी बँक व्यवस्थापकांशी दूरध्वनी वरुन संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थी, शेतकरी व शेतमजूर यांच्या मनात बँकेविषयी असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याची संबंधित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेवून होत असलेली ग्राहकांची लूट थांबवून नि:शुल्क नवीन खाते उघडण्याचे फार्म उपलब्ध करावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)