खासगी डॉक्टरांकडून होतेय रुग्णांची लूट
By Admin | Updated: July 24, 2015 01:19 IST2015-07-24T01:19:43+5:302015-07-24T01:19:43+5:30
आरोग्य सेवा ही सर्वोत्तम सेवा आहे. मात्र या सेवेला खासगी डॉक्टरांनी लुटमार अभियानाच्या माध्यमातून कलंकित करणे सुरू केले आहे.

खासगी डॉक्टरांकडून होतेय रुग्णांची लूट
रावणवाडी : आरोग्य सेवा ही सर्वोत्तम सेवा आहे. मात्र या सेवेला खासगी डॉक्टरांनी लुटमार अभियानाच्या माध्यमातून कलंकित करणे सुरू केले आहे. हा प्रकार ग्रामीण भागात फोफावत आहे. येथील डॉक्टरांकडून तपासणीसाठी अधिकची फी आकारुन लिकिंगच्या माध्यमातून रुग्णांची लूट करण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र अशा डॉक्टरांवर आळा घालून नियमाप्रमाणे कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
पावसाळा लागल्यामुळे आता आजारांमध्ये वाढ झाली आहे. याचा फायदा घेत ग्रामीण भागातील अनेक डॉक्टर व्यवसायीकच झालेले आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी जेवढा पैसा खर्च केला जातो, तो पैसा कमी वेळात व कमी श्रमात लवकर काढण्याच्या बेतात रुग्णांकडे लक्ष दिले जात नाही. पैसा कमविण्याकडे या डॉक्टरांचे अधिक लक्ष आहे. एखादा रुग्ण किरकोळ स्वरुपाच्या आजारावर औषधोपचारासाठी आला की त्या रुग्णाला ‘बळीचा बकरा’ कसा करता येईल व त्यापासून पैसा कसा काढता येईल याच विचारात हे डॉक्टर असतात. रुग्णांना असलेल्या आजारांबद्दल भीती निर्माण केली जाते. विविध कारणे समोर करुन पैसा उकलण्याच्या प्रयत्न केला जात आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची मानसिकता लुटारु झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
वाढलेली लोकसंख्या, दूषित जल-वायू व भेसळयुक्त खाद्यपदार्थ मानवी जीवनाला अपायकारक ठरत आहेत. पौष्टीक खाद्य पदार्थांचा अभाव व इतर कारणांमुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या संख्येतहीझपाट्याने वाढ होत आहे. काही डॉक्टरांनी गल्लोगल्लीत दुकानदाऱ्या सुरु केल्या आहेत. तर काही डॉक्टर घरपोच सेवेसाठी उपलब्ध आहेत. संपूर्ण आजारांवर उपचार करुन देवू असे म्हणून डॉक्टर रुग्णाला प्रयोगशाळा समजून किरकोळ स्वरुपाच्या आजारावरही महागडी व रंगीबेरंगी ब्रॅन्डेड कंपन्यांची औषधी लिहून देतात. ही औषधही ५०० रुपयांपेक्षा अधिक दराचीच असते. जवळील ठराविक औषध विक्रेत्यांची माहिती रुग्णांना देवून औषध विक्री व्यवसायाला सहकार्य करीत आपले कल्याण साधण्याचा बेधडक व्यवसाय हे खासगी डॉक्टर राजरोसपणे करीत आहेत. (वार्ताहर)
रुग्णांवर काही दिवस उपचार केल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधार न झाल्यास त्यांना आपल्या संबंधित डॉक्टरांकडून उपचार करवून घेण्याचा सल्ला दिला जातो. तोपर्यंत रुग्णांचा वेळ व पैसा खर्च होवून तो आजारीच असतो. डॉक्टरांना रुग्णाला नेमका कोणता आजार जडला हेच लक्षात येत नाही. त्यामुळे रुग्णाला नाईलाजास्तव शहरी भागातील डॉक्टरांजवळ जावून उपचार करावा लागतो. तोपर्यंत आजारही गंभीर रुप घेवून वाढतच जातो. डॉक्टरांनी जेनेरिक औषधे सूचवावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार होत असते. ती औषधे सर्वत्र मिळावी म्हणून शासन प्रयत्न करीत आहे. मात्र ग्रामीण भागातील औषध विक्रेते डॉक्टरांना हाच ब्रॅन्डेड माल खपवा, असा आग्रह करतात. त्यातून मिळणारे कमिशन विक्रेते आणि डॉक्टर परस्पर वाटून घेतात.