लोकमतच्या पुढाकारने चिमुकल्यांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:08 IST2018-11-24T22:06:55+5:302018-11-24T22:08:53+5:30
लातूर झालेल्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवातून परतणाऱ्या ईशान्य भारतातील मणिपूर येथील चिमुकल्यांना लोकमतच्या पुढाकाराने नागरिकांच्या सहकार्याने मदत करण्यात आली.

लोकमतच्या पुढाकारने चिमुकल्यांना मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लातूर झालेल्या राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवातून परतणाऱ्या ईशान्य भारतातील मणिपूर येथील चिमुकल्यांना लोकमतच्या पुढाकाराने नागरिकांच्या सहकार्याने मदत करण्यात आली. पुणे ते कलकत्ता मार्गे मणिपूर जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर आलेल्या आर्थिक संकटाला टाळण्यासाठी लोकमतने पुढाकार घेत सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने २१ विद्यार्थी व दोन शिक्षीकांना मदत केली आहे.
लातूर येथे १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजित राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवात देशातील अठरा राज्यातील मुले सहभामी झाले होते. मनिपूर येथील २१ विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. परंतु त्या विद्यार्थ्यांना घेऊन गेलेल्या तीन शिक्षक-शिक्षीकापैकी एका शिक्षकाला हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.औषधासाठी आलेल्या खर्चात त्यांच्या जवळील सर्व पैसे लागले. ते शिक्षक उपचार घेत असताना या विद्यार्थ्यांना दोन शिक्षीका आजाद हिंद एक्सप्रेसने शनिवारी (दि.२४) रोजी गोंदिया मार्गे कलकत्ता येथे जात होत्या. त्यांच्याजवळ पैसे नव्हते व खाण्यापिण्याचे साहित्य नसल्याची माहिती मिळताच गोंदिया लोकमतला कार्यालयातील कर्मचाºयांनी सामाजिक कार्यकर्ते अभय (सोनू) सावंत यांच्या मदतीने त्या विद्यार्थ्यांसाठी दोन वेळचे जेवण, फळे, नास्ता, पाण्याच्या बॉटलच्या दोन पेटी असे साहित्य गोंदिया स्थानकावर नेऊन त्या संकटात सापडलेल्या रेल्वे प्रवाश्यांना मदत केली. या वेळी सामाजिक कार्यकर्ता सविता बेदरकर, गोरेगावच्या माजी पं.स. सभापती आरती चवारे, अरविंद साव, लोकमतचे अंकुश गुंडावार, नरेश रहिले, मुकेशकुमार शर्मा, अतुल कडू, सचिन कावळे, विमुक्ता शर्मा, नरेश बोहरे उपस्थित होते. अविनाश ठाकूर यांनीही खाद्यपदार्थासाठी मदत केली. यशोदा बहुउद्देशिय विकास संस्था तथा उडाण बहुउद्देशिय विकास संस्था पदमपूर ता. आमगावनेही सहकार्य केले.