भजेपार येथे शिक्षक देण्यासाठी आज कुलूप ठोको आंदोलन
By Admin | Updated: July 31, 2014 00:07 IST2014-07-31T00:07:26+5:302014-07-31T00:07:26+5:30
सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या मागणीकरिता आज कुलूप ठोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन गावकऱ्यांनी खा. अशोक नेते,

भजेपार येथे शिक्षक देण्यासाठी आज कुलूप ठोको आंदोलन
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या मागणीकरिता आज कुलूप ठोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन गावकऱ्यांनी खा. अशोक नेते, जि.प. अध्यक्ष गोंदिया, शिक्षण सभापती जि.प. गोंदिया, खंडविकास अधिकारी सालेकसा, गटशिक्षणाधिकारी, तहसीलदार, ठाणेदार सालेकसा यांना सादर करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, पंचायत समिती सालेकसा अंतर्गत भजेपार येथे जि.प. शाळेत वर्ग पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाची सोय असून शासनाच्या निर्णयानुसार आठवा वर्ग सुरु करण्यात आला. सदर वर्गात एकूण ३१ विद्यार्थी आहेत. मात्र आठवा वर्ग सुरु होऊनही शिक्षक नियुक्त करण्यात आलेला नाही. वर्ग पहिली ते सातवीपर्यंतची विद्यार्थी संख्या १८२ असून केवळ सहा शिक्षक उपलब्ध आहेत. विद्यार्थी संख्येनुसार सदर शाळेत एक उच्चश्रेणी मुख्याध्यापक तसेच दोन पदवीधर शिक्षकांची जागा उपलब्ध आहे. मात्र शिक्षण विभागाने अजुनही शिक्षकांची सोय केलेली नाही. आठवा वर्ग उघडूनही शिक्षण विभागाने त्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती न केल्याने सदर वर्गाला कोण शिकविणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता शाळा व्यवस्थापन समिती, पालक तसेच गावकरी यांनी अनेकदा शिक्षण विभागाकडे शिक्षकांची मागणी केली. परंतु याकडे कानाडोळा केल्याने उद्या (दि.३१) गुरुवारला सकाळी १०.३० वाजता शाळा समिती व पालकांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. तसेच आठव्या वर्गाला शिक्षक मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येईल, असा ईशारा देण्यात आला आहे.
यात शाळा समितीचे अध्यक्ष अशोक तुकाराम मेंढे, उपाध्यक्ष छाया गायधने, उपसरपंच तुकाराम फुंडे, महेश चुटे, संगीता ब्राम्हणकर, बाळकृष्ण हेमने, शामराव कलचर, माया गायधने, विनोद ब्राम्हणकर तसेच पालक वर्ग यांचा समावेश आहे. (वार्ताहर)