‘लॉकडाऊन’च्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:00:22+5:30
गोंदिया शहरात एक रूग्ण मिळाला होता व तो बरा झाल्यानंतर आता गोंदिया ग्रीन झोनमध्ये आला आहे. देवाची कृपाच म्हणावी की गोंदिया जिल्हा वेळीच सावरण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले.याचाच फायदा जिल्ह्याला ग्रीन झोनमध्ये समावेश होवून काही शिथिलता मिळविण्यासाठी झाला. मात्र जिल्ह्याला देण्यात आलेली ही शिथिलताच आता जिल्हावासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

‘लॉकडाऊन’च्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरिही ‘लॉकडाऊन’ लागू असून रस्त्यावर फिरणाऱ्यांवर आवर घालणे पोलिसांची जबाबदारी आहे. यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र शहरात बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून गप्पा गोष्टीत मशगूल असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरवासीयांच्या मनात भीती नसून ते बिनधास्त फिरत ‘लॉकडाऊन’ नियमांची सर्रासपणे पायमल्ली करीत आहेत.
गोंदिया शहरात एक रूग्ण मिळाला होता व तो बरा झाल्यानंतर आता गोंदिया ग्रीन झोनमध्ये आला आहे. देवाची कृपाच म्हणावी की गोंदिया जिल्हा वेळीच सावरण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले.याचाच फायदा जिल्ह्याला ग्रीन झोनमध्ये समावेश होवून काही शिथिलता मिळविण्यासाठी झाला. मात्र जिल्ह्याला देण्यात आलेली ही शिथिलताच आता जिल्हावासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातही गोंदिया शहरातील चित्र बघता येथून ‘लॉकडाऊन’ हटविण्यात आल्यासारखे बघावयास मिळत आहे. शहरात मोठ्या संख्येत नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत असून त्यांच्या मनातून कोरोना व कायद्याची भीती नाहीशी झाल्याचे उघडपणे दिसत आहे.
ग्रीन झोन असलेल्या जिल्ह्यातही ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन करावे असे खुद्द मुख्यमंत्र्यांचे आदेश असतानाही मात्र जिल्हा व त्यातही शहरात जिल्हा प्रशासनाकडूनच पूर्ण सुट देण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, शहरात बंदोबस्तासाठी चौकाचौकांत कर्तव्यावर असलेले काही पोलीस कर्मचारी खुद्द तरूणांसोबत बसून गप्पा हाकलण्यात मशगूल असल्याचे बघावयास मिळाले. रस्त्यावर फिरणाºया लोकांवर कारवाई करण्यासाठी या पोलिसांना ठेवले आहे. त्यांच्याच सोबत पोलिसवाले गप्पा हाकत असल्याने लोकांच्या मनातील भीती हे चित्र बघून निघून गेली आहे. परिणामी शहरात ‘लॉकडाऊन’चा हटविल्याचे चित्र आहे.
चौकाचौकात होत आहे गर्दी
पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने तसेच काही ठरावीक भागातच कारवाया होत असल्याने अन्यत्र नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत. विशेष म्हणजे, शहरातील श्री टॉकीज चौक, सिव्हील लाईन्स परिसर, मामा चौक यासह अन्य भागांत दिवसभर गर्दी होते. तरूणांचे टोळके विनाकारण बसून गप्पा हाकलत असतात. मात्र पोलिसांकडून ना गस्त ना कारवाई असे धोरण असल्यामुळे अशांना रान मोकळे झाले आहे.