शाळेला ठोकले कुलूप
By Admin | Updated: July 23, 2015 01:40 IST2015-07-23T01:40:30+5:302015-07-23T01:40:30+5:30
शहापूर केंद्रांतर्गत येत असलेल्या हत्तीडोई येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकाचे पद रिक्त आहे.

शाळेला ठोकले कुलूप
मोहदुरा : शहापूर केंद्रांतर्गत येत असलेल्या हत्तीडोई येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकाचे पद रिक्त आहे. याची मागणी करण्यात आल्यानंतरही शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे शालेय व्यवस्थापन समिती, गावकरी, माता पालक संघाच्या सदस्यांनी मंगळवारी शाळेला कुलूप ठोकले.
हत्तीडोई येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेची पटसंख्या १२८ असून सहा शिक्षकांची पदे मंजूर आहेत. परंतु चारच शिक्षक कार्यरत आहेत. सन २०१४-१५ या सत्रात आठवा वर्ग उघडण्यात आला. त्या अनुषंगाने वर्ग सहा ते आठ साठी दोनच पदवीधर शिक्षक आहेत. आणि विज्ञान शिक्षकाची जागा अजूनही रिक्तच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत असून समितीने खंड विकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना १३ जुलै रोजी निवेदन देवून त्वरीत शिक्षकाची जागा भरण्याची मागणी केली होती. परंतु दहा दिवस लोटूनही संबंधितांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. अशातच गावकऱ्यांनी निर्णय घेत शाळेला कुलूप ठोकले.
त्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत समितीने सदस्यांनी याची माहिती विस्तार अधिकारी के.के. पाटील यांना दूरध्वनीवरून दिली. पाटील यांनी उद्याला शिक्षक पाठवित असल्याचे आश्वासन दिले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत कमेटी, माता पालक संघ व महिला बचत गट तथा गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)