बिरसी विमानतळात स्थानिकांना काम बंदचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:52+5:302021-01-13T05:15:52+5:30
गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळ प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला २००७ पासून सुरुवात झाली तेव्हापासून या प्रकल्पात स्थानिक नागरिकांना व प्रकल्पग्रस्तांना अधिकाधिक ...

बिरसी विमानतळात स्थानिकांना काम बंदचे आदेश
गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळ प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला २००७ पासून सुरुवात झाली तेव्हापासून या प्रकल्पात स्थानिक नागरिकांना व प्रकल्पग्रस्तांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन तत्कालीन जिल्हा व विमानतळ प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी दिले होते.
बिरसी परिसरातील अनेक बेरोजगार युवकांना या प्रकल्पात सुरक्षारक्षक म्हणून रोजगारही उपलब्ध करून देण्यात आला. हे जरी खरे असले तरी आता तब्बल तेरा वर्षे नोकरी केल्यानंतर या सर्व नागरिकांना विमानतळ प्रशासनाने कामावरून बंद केल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. विमानतळ प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या विरोधात घेतलेल्या या पवित्र्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. विमानतळ निर्देशकावर कारवाई करून बंद केलेल्या सर्व सुरक्षारक्षकांना त्वरित कामावर घेण्याची मागणी सुरक्षारक्षकांनी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. बिरसी, कामठा, परसवाडा तसेच झिलमिली या गावातील नागरिकांच्या शेतजमिनी व घरेदेखील अधिग्रहित करण्यात आली. मोबदल्यात परिसरातील नागरिकांना सुरक्षारक्षक म्हणून रोजगार उपलब्ध करून दिला. तब्बल तेरा वर्षांचा काळ उलटला आहे. या सेवेवरच ते आपल्या कुटुंबाचा गाडा चालवीत आहेत. परंतु इतकी वर्षे सेवा केल्यानंतर आता विमानतळ प्रशासनाने या सर्व कामगारांना कामावरून काढून कायमचे बंद केले आहे. त्यामुळे या सर्वांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. विमानतळ प्रशासनाने यांना कोणतीही सूचना किंवा नोटीससुध्दा दिली नाही. जिल्हा प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन या सर्व कामगारांना पुन्हा कामावर सामावून घेण्याची मागणी केली आहे.