‘ग्लोबल वार्मिंग’च्या संकटात अडकली सजीव सृष्टी
By Admin | Updated: March 22, 2015 00:55 IST2015-03-22T00:55:38+5:302015-03-22T00:55:38+5:30
विविध कारणांमुळे वृक्ष तोडीचे प्रमाण वाढल्याने वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे.

‘ग्लोबल वार्मिंग’च्या संकटात अडकली सजीव सृष्टी
देवानंद नंदेश्वर भंडारा
विविध कारणांमुळे वृक्ष तोडीचे प्रमाण वाढल्याने वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. सजीव सृष्टी ‘ग्लोबल वार्मिंग’च्या संकटात अडकली आहे. निसर्गचक्र बदलत असल्यामुळे त्याचा परिणाम सजीवांवर होत आहे. ऋतुंमध्ये होणारा बदल, गारपीट, अतिवृष्टी, वातावरणातील बदल हा त्याचाच परिणाम आहे. जंगलांचे संरक्षण करण्यासाठी वृक्षतोडीविरुद्ध जनजागृती करून वृक्ष लागवडीसाठी प्रबोधन करण्याची गरज बळावली आहे.
भंडारा वनविभागाच्या कार्यक्षेत्रात भंडारा, लाखनी, पवनी, लाखांदूर, साकोली, मोहाडी व तुमसर हे सात तालुके आहेत. भंडारा वनविभागाचे १० वनपरिक्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. भंडारा, अड्याळ, पवनी, साकोली, तुमसर, जांब (कांद्री), लेंडेझरी, नाकाडोंगरी आणि लाखांदूर या वनक्षेत्राचा समावेश आहे. या विभागात ३८ परिमंडळ असून नियत क्षेत्रांची संख्या १५६ एवढी आहे.
जिल्ह्यातील एकूण ३,७१६.६५ भौगोलिक क्षेत्रापैकी १२०३.५५६ चौ.कि.मी. वनाचे क्षेत्र आहे. वनविभागाकडे ८८१.८५४ चौ.कि.मी., महाराष्ट्र वन विकास महामंडळाकडे ९१.४३६ चौ.कि.मी., वन्यजीव विभागाकडे २२५.४८२ चौ.कि.मी. तर मोहघाटा रिसर्च सेंटरकडे ४.७८४ चौ.कि.मी. वन क्षेत्र आहे. ५००४७.११९ कि़मी. मध्ये राखीव, २७७.७६७ कि़मी. मध्ये संरक्षीत वन, ९९.६५४ कि़मी. मध्ये झुडपी जंगल तर ४.५१७ वर्ग कि़मी. मध्ये अवर्गीकृत क्षेत्राचा समावेश आहे.
जिल्ह्यात तसेच परिसरात घनदाट जंगल व वन्यप्राण्यांच्या अधिवास आहे. या जंगलात वाघा सारख्या उमद्या प्राण्या सह बिबट, हरिण, अस्वल आदी वन्यप्राणी आहेत. तसेच साग व अन्य प्रजातींची मौल्यवान झाडेही मोठ्या प्रमाणात आहेत. उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी प्रत्येक वनक्षेत्रात ३५ पानवठे आहेत. मानवाच्या जगण्याच्या प्रक्रियेत झाडांचा मोलाचा वाटा आहे. मात्र मानवाने झाडे तोडायला सुरूवात केली आणि त्याचा वापर करायला लागला. त्यामुळे जंगलाची तोड झाली आणि जंगलाचे प्रमाण घटले. जंगलतोडी बरोबर औषधीयुक्त झाडे तोडली जात आहेत.