लिफ्टची सुविधा मिळणार चार महिन्यांत
By Admin | Updated: July 23, 2016 02:14 IST2016-07-23T02:14:08+5:302016-07-23T02:14:08+5:30
येथील रेल्वे स्थानकावर येणाऱ्या वृद्ध व दिव्यांगांसाठी खुशखबर असून रेल्वे प्रशासनाकडून त्यांना सुविधेची भेट दिली जाणार आहे.

लिफ्टची सुविधा मिळणार चार महिन्यांत
एस्कलेटर प्रलंबितच : बांधकाम झाल्यावर विद्युत विभागाचे काम होणार सुरू
गोंदिया : येथील रेल्वे स्थानकावर येणाऱ्या वृद्ध व दिव्यांगांसाठी खुशखबर असून रेल्वे प्रशासनाकडून त्यांना सुविधेची भेट दिली जाणार आहे. ही भेट लिफ्टची असून येत्या चार महिन्यांत रेल्वे स्थानकावर लिफ्ट सज्ज होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून मिळाली आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र आवश्यक असणाऱ्या सुविधा या स्थानकावर नसल्याने प्रवाशांची मोठीच तारांबळ होते. त्यात वृद्ध व दिव्यांगांची एका फलाटावरून दुसऱ्या फलाटार जाताना चांगलीच कसरत करावी लागते. यावर तोडगा म्हणून मागील काही महिन्यांपासून स्थानकावर लिफ्टचे काम सुरू करण्यात आले आहे.
बांधकामाचे काम पूर्ण झाल्यावर विभागाकडून यांत्रीक व विद्युत विभाग लिफ्टशी संबंधित मशीन्सची जोडणी करणार आहे. आता बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्यामुळे हे काम उरकल्यावर लगेच यांत्रीक व विद्युत विभाग आपल्या कामावर लागणार आहे.
त्यामुळे येत्या चार महिन्यांत लिफ्टचे काम पूर्ण होणार असून प्रवाशांसाठी ही सुविधा खुली केली जाणार असल्याचा अंदाज विभाग व्यक्त करीत आहे. ही सुविधा शहरवासीयांसाठी फायद्याची ठरणार आहे. (प्रतिनिधी)
सिक्के घाला व तिकीट घ्या
गोंदिया स्थानकावरील तिकीट खिडक्यांसमोर प्रवाशांची लागणारी लांबच लांब रांग बघता रेल्वे विभागाकडून ‘आॅटोमेटिक टिकेट वेंडिंग मशिन’ची व्यवस्था करण्यात आली आहे. बाजार परिसराकडील रेल्वे स्थानकात स्मार्ट कार्डने संचालित होणाऱ्या दोन मशीन्स लागल्या आहेत. तर क्वॉईनद्वारे संचालित होणारी एक मशीन गोंदिया स्थानकाला उपलब्ध झाली आहे. मात्र ही सिक्क्यांद्वारे संचालित होणारी मशीन अद्याप लावण्यात आली नाही. ही सिक्क्यांद्वारे संचालित होणारी तिकीट वेंडिंग मशीन रेल्वे स्थानकाच्या रेलटोली भागाकडे लागणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रवाशांनी मशिनमध्ये शिक्के घातले की अगदी कमी वेळात मशिन तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रवाशाने दर्शविलेल्या स्थानकाचे तिकीट त्याला मिळेल. लोकल प्रवाशांच्या तिकिटांसाठी या मशिन्स उपयोगी ठरतील.
एस्कलेटरचे काम लांबले
लिफ्टचे काम झाल्याशिवाय एस्कलेटरचे काम स्थानकावर सुरू होणार नसल्याचे कळले. त्यामुळे लिफ्टला आता चार महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानंतर एस्कलेटरचे काम होणार आहे. यामुळे एस्कलेटरसाठी आणखी चार महिने मुहूर्त मिळणार नसल्याचे दिसते. त्यानंतरही कधी एस्कलेटरचे काम सुरू होते व ही सुविधा येथील प्रवाशांना कधी उपलब्ध होते हे येणाऱ्या काळातच दिसून पडेल.