जिल्ह्यातून कोरोना घेतोय काढता पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST2021-07-07T04:36:04+5:302021-07-07T04:36:04+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. रविवारी बाधितांची शून्य, तर सोमवारी (दि.५) एका बाधिताची नोंद झाली. रुग्णसंख्येत ...

जिल्ह्यातून कोरोना घेतोय काढता पाय
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. रविवारी बाधितांची शून्य, तर सोमवारी (दि.५) एका बाधिताची नोंद झाली. रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत असून, कोरोना आता जिल्ह्यातून काढता पाय घेत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
काेराेना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी (दि. ५) १०९८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ८२५ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २७३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १ नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याचा पाॅझिटिव्हिटी रेट ०.०९ टक्के आहे. सोमवारी ५ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर १ रुग्णाची नोंद झाली आहे. मागील महिनाभरापासून बाधितांची संख्या सातत्याने घटत असून मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ३९ वर आल. आहे. तर तीन तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. हे चित्र असेच कायम राहिल्यास जिल्हा कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,९९,५८० स्वॅब नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १,७४,४९९ निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत २,१८,६७० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,९७,५९७ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,१५३ बाधित आढळले असून, यापैकी ४०,४१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ३९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे.
..................
रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ
कोरोनाबाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. सध्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९८.२० टक्के असून, तो राज्यापेक्षा २.२० टक्क्यांनी अधिक आहे.
....................