आंचलिक भाषा संशोधन केंद्राचा शुभारंभ
By Admin | Updated: June 25, 2014 00:30 IST2014-06-25T00:30:34+5:302014-06-25T00:30:34+5:30
आॅल इंडिया आदिवासी साहित्य संघ आणि रमणिक फाऊंडेशनच्या (नवी दिल्ली) वतीने महाराष्ट्र झोनच्या आंचलिक भाषा संशोधन केंद्राचा शुभारंभ तालुक्यातील ग्राम धनेगाव येथे करण्यात आला.

आंचलिक भाषा संशोधन केंद्राचा शुभारंभ
सालेकसा : आॅल इंडिया आदिवासी साहित्य संघ आणि रमणिक फाऊंडेशनच्या (नवी दिल्ली) वतीने महाराष्ट्र झोनच्या आंचलिक भाषा संशोधन केंद्राचा शुभारंभ तालुक्यातील ग्राम धनेगाव येथे करण्यात आला. पाच राज्यातील भाषा तज्ञ प्रतिनिधींच्या विशेष उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन गोंडी संस्कृतीचे संशोधक धर्माचार्य मोतीरावण कंगाली यांच्या अध्यक्षतेत माजी आयुक्त डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते करण्यात आले. याप्र्रसंगी भाषा संशोधन प्रकल्पाचे संयोजक व गोंडवाना दर्शन मासीक पत्रिकेचे संस्थापक सुन्हेरसिंह ताराम, महाराष्ट्रातील जेष्ठ लेखिका व कवयित्री तसेच संशोधन केंद्राच्या मुख्य सूत्रधार उषाकिरण आत्राम, गोंडवाना दर्शनचे संपादक बी.एल.कोर्राम, लिंगोदर्शनचे संपादक कोमलसिंह मरई, आंध्रप्रदेशचे भाषा संशोधक माणिकराव अरके, छत्तीसगड येथील भाषा विकास केंद्राचे संयोजक आचला गुरूजी, इलाहाबाद (उ.प्र.) येथील रामनाय ओईमा, चुन्नीलाल राऊत व इतर गणमान्य लेखक, संशोधक, कवि व आदिवासी भाषेचे अभ्यासक उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना ताराम यांनी भारतात मायभाषा, बोली भाषा व आदिवासी क्षेत्राची गोंडी व हल्बी भाषा किती महत्वाची आहे. परंतु काळानुसार या भाषा लोप पावत आहेत. त्यामुळे आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात गोंडी धर्माचार्य कंगाली म्हणाले की, एकेकाळी आपल्या देशात १७७ भाषा आणि ५४४ बोलीचा उल्लेख होता. परंतु संविधानात फक्त २२ भाषांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे भाषेचा मोठा वारसा आता आपल्या देशातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या परिस्थीतीमुळे उषाकिरण आत्राम यांनी सुरू केलेले भाषा संशोधन केंद्र क्षेद्रीय भाषाना जीवनदान देणारा मैलाचा दगड सिध्द होवू शकतो. तर उद्घाटक डॉ. किरसान म्हणाले की, आदिवासी संस्कृतीमध्ये भाषेच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानता सहनशीलता व भाषेचे जतन करणारे प्रेरणादायी कार्य केले जात होते. जे आज संविधान दिलेले आहे. त्याचे पालन आदिवासी समाजपूर्वीपासून करीत आलेला आहे. त्यामुळे संस्कृती व प्रकृतीचे रक्षण करण्यात आदिवासी व त्यांची भाषा किंवा माय बोली फार महत्वाची भूमिका पार पाडत राहीली आहे.
याप्रसंगी विविध राज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी हिंदी, मराठी सोबतच गोंडी व हल्बी भाषेत आपले विचार प्रकट करीत आपल्या मायबोलीबद्दल आस्था प्रकट केली.
कार्यक्रमाचे संचालन लेखिका उषाकिरण आत्राम यांनी केले. तर आभार नत्थु उईके यांनी मानले. याप्रसंगी विविध वृत्तपत्राचे व वृत्तवाहिण्याचे प्रतिनिधी सुध्दा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुलाबसिंह कोवाची, सोहन उईके, सीताराम कोरेगा, जितेंद्र कोसमे, वसंतराव पेंढारे, मेसराम लिंगु, गोरेलाल सोनी, प्रल्हाद नेताम, परदेशी गावडे, देवनाथ कुंजाम, गुरूराम मडावी, दीपक कळपाते, व्यंकट पिपरे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)