सौर कृषी पंप योजनेचा शुभारंभ
By Admin | Updated: May 4, 2016 02:50 IST2016-05-04T02:50:53+5:302016-05-04T02:50:53+5:30
ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवीत असलेल्या

सौर कृषी पंप योजनेचा शुभारंभ
कपिल केकत ल्ल गोंदिया
ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवीत असलेल्या ‘सौर कृषी पंप योजने’चा जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे. या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या १० अर्जदारांच्या जोडणीचे कार्यादेश संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता लवकरच हे काम सुरू होणार असून जिल्ह्यात सौर कृषी पंप बघावयास मिळणार आहे.
नियमित विद्युत पुरवठा किंवा विद्युत जोडणी नसल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर, पर्यायाने राज्यावर विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीला अनुदान द्यावे लागत आहे. शिवाय औष्णिक पद्धतीच्या वीज निर्मितीमुळे पर्यावरणाचा ऱ्हासही होत आहे. राज्यात बहुतांश वीज निर्मिती औष्णिक पद्धतीने होत आहे. त्यामुळे वायू प्रदूषणात भर पडत असून हवमानावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी आता सौर ऋर्जेचा वापर करण्याचे ठरविले व त्यातूनच ‘सौर कृषी पंप योजना’ पुढे आली. या योजनेला २४ फेब्रुवारी २०१५ रोजी मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून आॅगस्टपासून ही योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याला १९५ वीज जोडण्या देण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. एकंदर कृषी पंपांना सौर ऊर्जेतून वीज पुरवठा झाल्यास शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी ताटकळत रहावे लागणार नाही. शिवाय वीज बिलाची थकबाकी असल्यास होणारी पंचाईत व वीज चोरीच्या प्रकारांपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. एवढेच नाही तर वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारापासून शेतकरी मुक्त होऊन आपल्या शेतीला कधीही पाणी पुरवठा करू शकणार हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. जिल्ह्यात प्रथमत: या योजनेंतर्गत १० अर्जदारांची निवड करण्यात आली असून शुक्रवारी (दि.२९) त्यांचे कार्यादेश संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत. आता लवकरच या १० कार्यादेशांवर कंपनीकडून काम करून सौर कृषी पंप योजना कार्यरत केली जाणार आहे. एकंदर काही दिवसांनी जिल्हावासीयांना वीज वितरण कंपनीचा सौर उर्जेवर कृषी पंप बघावयास मिळणार आहे.
पाच एकरपेक्षा कमी शेतीवाल्यांना लाभ
४पाच एकरपेक्षा कमी शेती असलेले शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शिवाय यासाठी विहीर असणे व त्या विहिरीला सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असणे अनिवार्य राहणार असून अतिदुर्गम भागतील शेतकरी, पारंपारिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेल्या भागातील शेतकरी, महावितरणक डे पैसे भरून प्रलंबीत असलेल्या ग्राहकांपैकी ज्यांना तांत्रीक अडचणींमुळे नजीकच्या काळात वीज पुरवठा शक्य नाही असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेंतर्गत मिळणारे अनुदान
४या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून ३, ५ व ७.६ एचपीचे (अश्वशक्ती) पंप पुरविण्यात येत असून त्यासाठी आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील पाण्याची पातळी बघता ३ एचपी पंप उपयुक्त ठरत आहे. या ३ एचपी पंपाची आधारभूत किंमत ३.२४ लाख रूपये असून यात ३० टक्के (९७,२०० रूपये) अनुदान केंद्र शासनाकडून ५ टक्के अनुदान (१६,२०० रूपये) राज्य शासनाकडून, ५ टक्के (१६,२०० रूपये) हिस्सा लाभार्थीला भरावयाचा असून उर्वरीत एक लाख ९४ हजार ४०० रूपये कर्ज स्वरूपात महावितरण भरणार आहे.
आणखी १६ अर्ज झाले मंजूर
४या योजनेंतर्गत पूर्वीच १६ अर्ज मंजूर झाले असून त्यांनी पैसे भरले आहेत. या योजनेंतर्गत १० सौर कृषी पंप जोडणीचा टप्पा ठरविण्यात आला आहे. त्यामुळे सहा अर्ज शिल्लक आहेत. असे असतानाच वीज वितरण कंपनीकडे भूजलतज्ज्ञ, वीज वितरण कंपनी व कृषी अधीक्षक कार्यालयाकडून मंजूरी मिळालेले आणखी १६ अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे कार्यादेश देण्यात आलेले हे १० अर्जदार देवरी विभागातील आहेत.