तीन वर्षांत २७ बंधाऱ्यांची कामे पूर्ण
By Admin | Updated: December 29, 2014 01:44 IST2014-12-29T01:44:00+5:302014-12-29T01:44:00+5:30
पाण्याची सुविधा नसल्याने एका पावसाअभावीसुद्धा धान पिकाचे उत्पन्न नाहिसे होत होते. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतला. यापूर्वी गतिमान योजना होती.

तीन वर्षांत २७ बंधाऱ्यांची कामे पूर्ण
काचेवानी : पाण्याची सुविधा नसल्याने एका पावसाअभावीसुद्धा धान पिकाचे उत्पन्न नाहिसे होत होते. शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतला. यापूर्वी गतिमान योजना होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे. तिरोडा तालुक्यात कृषी विभागाने एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत २३ बंधारे व गतिमान योजनेतून चार बंधारे १ कोटी ५२ लाख रूपये खर्चून तयार केली आहेत. यातून २७५ हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे.
तालुका कृषी विभागांतर्गत दोन मंडळ आहेत. सर्वाधिक तिरोडा मंडळ कृषी विभागात सिमेंट बंधारे तयार करण्यात आले आहेत. तिरोडा मंडळांतर्गत सन २०११-१२ मध्ये बेरडीपार व डब्बेटोला येथे पाच बंधारे २६ लाखांच्या खर्चाने तयार करण्यात आले. आलेझरी येथे चार बंधारे १८ लाखांच्या खर्चाने, गोंडमोहाळी येथे तीन बंधारे १८ लाखांच्या खर्चाने, गतिमान योजनेंतर्गत मुंडीकोटा येथे चार बंधारे १६ लाख रूपयांच्या खर्चाने तयार करण्यात आलीत. या १६ बंधाऱ्यांवर ६८ लाख रूपये खर्च करण्यात आले. त्याद्वारे १८२ हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ होणार आहे.
सन २०१२-१३ मध्ये गोंडमोहाडी येथे २८ लाख रूपये खर्चून चार बंधारे तयार करण्यात आले. येथील पाण्याचा लाभ ४२ हेक्टर क्षेत्राला मिळत आहे. सन २०१३-१४ मध्ये एकूण सात बंधारे तयार करण्यात आले. यात गोंडमोहाडी, इंदोरा व मेंढा येथे प्रत्येकी दोन बंधारे तयार करण्यात आले.
त्यासाठी ४८ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. तसेच खडकी येथे आठ लाख रूपये खर्चून एक बंधारा तयार करण्यात आला आहे. यावर्षी सात बंधाऱ्यांसाठी ५६ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. या सात बंधाऱ्यांतून ४२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाला लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तीन वर्षांत तिरोडा कृषी विभागाने एकूण २७ बंधाऱ्यांची कामे पूर्ण केली असून त्यासाठी एक कोटी ५२ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे २७५ हेक्टर क्षेत्राला पाण्याच्या सिंचनाचा लाभ होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत व गतिमान योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांपासून शेतपिकांसह गुरांना पाणी पिण्याची सोय उपलब्ध झाली आहे. नागरिकांना तसेच महिलांना कपडे धुण्यासाठी व घरगुती उपयोगासाठी पाण्याच्या सुविधेचे साधन म्हणून उपयोगी ठरणार आहेत. बंधाऱ्यात पाण्याचे साठवण राहिल्याने परिसरातीलच नव्हे तर १० ते १५ किमी दूरपर्यंत पाण्याच्या पातळीत सुधारणा होणार आहे. (वार्ताहर)