शेतीची मशागत अंतिम टप्यात
By Admin | Updated: June 8, 2014 23:59 IST2014-06-08T23:59:19+5:302014-06-08T23:59:19+5:30
उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकर्यांना शेतीची पूर्ण मशागत करणे आवश्यक असते. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे.

शेतीची मशागत अंतिम टप्यात
रावणवाडी : उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकर्यांना शेतीची पूर्ण मशागत करणे आवश्यक असते. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीत व्यस्त आहे. शेतकरी सर्व दु:ख बाजूला सारुन यावर्षी निसर्ग आपल्याला साथ देईल म्हणून रखरखत्या उन्हात शेतीच्या मशागतीचे कार्य जोमाने करू लागला आहे.
येत्या काही वर्षापूर्वीपासून शेतकर्यांना विविध प्रकारच्या समस्या सहन कराव्या लागत होत्या. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाच्या छायेत शेतकरी वावरत आहे. आज ऋतूप्रमाणे कोणत्याही ऋतूत कधी उन्हाळ्यात, हिवाळ्यात अकाली पाऊस, किटकांचा प्रकोप होत असल्याने उन्हाळी हंगामात शेतात घेतलेले रबी पिकेही जमीनदोस्त होत आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या वाट्याला काहीही उरले नाही. शेतकर्यांना निसर्गही साथ देत नसून शासनही शेतकर्यांना वेळोवेळी मदत करीत नाही. अशा परिस्थितीत शेतकर्यांनी कुणाकडून दाद मागावी अशा प्रश्न शेतकर्यांसमोर पुढे ठाकला आहे. यावर्षी उन्हाळ्यात निसर्ग रबी पिकासाठी उपयुक्त नसून सुरुवातीच्या काळात अकाली पावसाने दमदार हजेरी लावून पूर्णत: तालुक्यास झोडपून काढले. त्यामध्ये शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले.
रबी पिकासाठी पेरलेले बियाणे पूर्णपणे उगलेच नाही. तर काही पाण्याने हिरावून घेतले. अशाप्रकारे कठीण समस्या येऊनही शेतकर्याने शेतीविषयी आस सोडली नाही. तो पुन्हा या भिषण गर्मीच्या चटक्यात शेतात घाम गाळीत आहे. येत्या खरीप हंगामात चांगले पीक हाती लागेल या उद्देशाने शेतकरी शेत कामासाठी लागणारे विविध प्रकारचे औजारे यांची विधीवत पूजा-अर्चना करुन खरीप हंगामासाठी शेतीच्या पूर्ण मशागतीच्या कामाला लागला आहे.
सकाळी ६ वाजतापासून आपल्या घराबाहेर पडलेला हा शेतकरी सायंकाळी ६ वाजतापर्यंंत घरी परत येत नाही. पूर्ण दिवसभर उन्हात भिषण गर्मीचे चटके झेलत शेतीच्या पूर्व मशागतीत मग्न दिसून येत आहे. यंदातरी बर्यापैकी उत्पन्न होवून कर्जापासून मुक्तता मिळेल, याच आशेत शेतकरी आहे. (वार्ताहर)