अरूणनगर स्थानकावर सुविधांचा अभाव
By Admin | Updated: August 13, 2014 23:57 IST2014-08-13T23:57:36+5:302014-08-13T23:57:36+5:30
जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बंगाली निर्वासितांची वस्ती असलेल्या अरूणनगर येथे सन १९८५ पासून रेल्वे गाड्यांचा थांबा देण्यात आला आहे. परंतु या थांब्यावर अनेक सुविधांचा

अरूणनगर स्थानकावर सुविधांचा अभाव
अरूणनगर : जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बंगाली निर्वासितांची वस्ती असलेल्या अरूणनगर येथे सन १९८५ पासून रेल्वे गाड्यांचा थांबा देण्यात आला आहे. परंतु या थांब्यावर अनेक सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाशांची मोठीच गैरसोय होत आहे.
अरूणनगर रेल्वे स्थानकावरून आसोली, बोरी, एगाव, खामखुरा, इंदोरा आदी अनेक गावातील प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात. या स्थानकावरून दररोज जवळपास ३०० ते ४०० प्रवाशी ये-जा करतात. मात्र गोंदिया-बल्लारशहा मार्गावरील या रेल्वे स्थानकाची रेल्वे विभाग उपेक्षा करीत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे या स्थानकात दिसून येते.
सदर रेल्वे स्थानकावर १५ बाय २० फुटाच्या प्रवाशी शेडचे बांधकाम करण्यात आले होते. सध्या हे शेड दयनिय अवस्थेत आहे. येथील फ्लोरींग व प्लास्टर उखडले आहे. येथे सरपटणारे जीवजंतू नेहमीच आढळतात. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला कधीही धोका उद्भवू शकतो.
येथे प्रवाशांच्या सेवेसाठी बेंचेस लावलेले आहेत. तेही आता मोडलेल्या व तुटलेल्या अवस्थेत आहेत. प्लॅटफॉर्मची लांबी कमी असल्यामुळे गाडी थांबल्यावर मागील पाच डबे झुडूपी जंगलात असतात. प्लॅटफॉर्मवर प्रकाशाची व्यवस्थादेखील नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस प्रवाशांची गैरसोय होते.
येथील मानवरहित रेल्वे फाटकाजवळ अंडरग्राऊंडचे काम करण्यात आले. मात्र पावसाच्या पाण्याने या अंडरग्राऊंडमध्ये पाच फुटापर्यंत पाणी भरले आहे. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प पडून तेथून येणे-जाणे करणे बंद झाले आहे. यावर उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)