केटीएसचा कारभार अस्थायी डॉक्टरकडे
By Admin | Updated: August 14, 2014 23:47 IST2014-08-14T23:47:22+5:302014-08-14T23:47:22+5:30
शासनाच्या प्रत्येक विभागात पद व सेवाजेष्ठतेला प्राधान्य दिले जाते. परंतु गोंदियाच्या आरोग्य विभागात सेवाजेष्ठतेला किंवा पदवीला मागे टाकून चक्क अस्थायी असलेल्या डॉक्टरला मागील

केटीएसचा कारभार अस्थायी डॉक्टरकडे
अजब कारभार : वर्ग एकच्या पाच अधिकाऱ्यांना डावलले
गोंदिया : शासनाच्या प्रत्येक विभागात पद व सेवाजेष्ठतेला प्राधान्य दिले जाते. परंतु गोंदियाच्या आरोग्य विभागात सेवाजेष्ठतेला किंवा पदवीला मागे टाकून चक्क अस्थायी असलेल्या डॉक्टरला मागील दिड ते दोन वर्षापासून केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालायाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत ठेवण्यात आले. यामध्ये कोणाचा ‘इंटरेस्ट’ आहे याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.
कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालयात प्रथम वर्गाचे पाच अधिकारी असताना निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची धुरा अस्थायी डॉक्टर अनिल परियाल यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मागील दीड ते दोन वर्षापासून ते निवासी वैद्यकीय अधिकारी पद सांभाळत आहेत. शासनाने त्यांना ११ महिन्यांच्या बॉंडवर ठेवले आहे. केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथम वर्गाचे डॉ.राजेंद्र जैन, डॉ. पालीवाल, डॉ.राज वाघमारे कार्यरत आहेत.
याशिवाय बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात डॉ. संजीव दोडके व डॉ. अमरीश मोहबे हे पाच डॉक्टर प्रथम वर्गाचे असताना त्यांच्यावर निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची धुरा न देता ११ महिन्यांच्या बाँडवर असलेल्या अस्थायी डॉ. अनिल परियाल यांच्या खांद्यावर ही धुरा सोपविली आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे प्रथम वर्गाचा वैद्यकीय अधिकारी यांच्यावरच ही जबाबदारी देणे आवश्यक असते. परंतु त्यांना डावलून अस्थायी अधिकाऱ्याकडे निवासी वैद्यकीय अधिकारीपदाचा कारभार देणे, ही बाब चर्चेचा विषय झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.रवि धकाते यांची असली तरी ही नियुक्ती आरोग्य उपसंचालकांनी केली असल्यास त्यांनी कोणत्या आधारावर ही नियुक्ती केली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)