आमगाव : आमगाव तालुक्यातील बिरसी येथील आशिष किराणा दुकानाचे मालक इंदरलाल जेठानंद लालवानी (५५) यांची अज्ञात आरोपींनी धारधार शस्त्राने हत्या केली. लालवानी यांच्या घरातच घडलेली ही घटना मंगळवारी उघडकीस आली.आमगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बिरसी येथे मागील २५ वर्षापासून राजनांदगाव येथील इंदरलाल लालवानी यांनी किराणा दुकान थाटले आहे. कुटूंबापासून लांब अंतरावर असूनसुध्दा त्यांनी व्यवसायाला प्रगती दिली होती. त्यांचे प्रतिष्ठान व घर एकच असल्याने ते नेहमी त्याच ठिकाणी कायमचे स्थायिक होते. लालवानी १६ मार्चला आपले प्रतिष्ठान असलेल्या निवासस्थानी होते. रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. यावेळी ते घरात एकटेच होते. मध्यरात्री ते पहाटेदरम्यान अज्ञात मारेकऱ्यांना त्यांची हत्या घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले. मारेकऱ्यांनी लालवानी यांच्या डोक्यावर व अंगावर धारदार शस्त्राने धाव करून जखमी केले होते. सकाळी त्यांच्याकडे दूध देणाऱ्याने दार ठोठावले. पण प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शेजारी राहणारे आनंद छाबडा यांच्यासह घराची पाहणी केली. त्यावेळी इंदरलाल रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना लगेच गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बी.डी.मडावी, उपनिरीक्षक सचिव पवार, पो.ह.राजेश भुरे, विनोद बरैया, रवि खिराले करीत आहेत. पोलिसांनी सदर प्रकरणात अज्ञात आरोपीविरूध्द भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. (शहर प्रतिनिधी)
बिरसीत किराणा व्यवसायिकाची हत्या
By admin | Updated: March 18, 2015 01:03 IST