The key to the luck of the candidates in the hands of women | महिलांच्या हाती उमेदवारांच्या नशिबाची चावी
महिलांच्या हाती उमेदवारांच्या नशिबाची चावी

ठळक मुद्देपुरूषांपेक्षा ७२०१ महिला मतदार अधिक : जिल्ह्यात एकूण ५,५१,८२० महिला मतदार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणूक जाहिर झाली असून आता मतदारांचा आर्शिवाद मिळवून घेण्यासाठी इच्छूकांची धावपळ सुरू होणार आहे. यंदा जिल्ह्यात १० लाख ९६ हजार ४४१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र विशेष बाब म्हणजे, यामध्ये महिला मतदारांची संख्या पुरूषांच्या तुलनेत सात हजार २०१ महिला मतदार जास्त असल्याने उमेदवारांना त्यांना खूश करणे जास्त गरजेचे झाले आहे. कारण, महिलांच्या हाती उमेदवारांच्या नशिबाची चावी असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
निवडणूक म्हटली की, एक मतावर जय व पराजय अवलंबून असतो व असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे उमेदवारांना आहे त्या मतदाराला आपल्याकडे वळविण्याची कसोटीच निवडणुकीत असते. म्हणूनच उमेदवारांकडून साम, दाम, दंड व भेद या शस्त्रांचा वापर करून कशाही प्रकारे विजयाची माळ खेचण्याचा प्रयत्न केला जातो.
त्यामुळे निवडणुकीत मतदारांचा कौल ज्याला मिळाला त्याचाच विजय निश्चित असतो. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करताच जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यात इच्छुकांकडून मतदारांची बेरीज व वजाबाकी करणे सुरू झाले आहे.
यंदा जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात एकूण १० लाख ९६ हजार ४४१ ंमतदार मतदानाच हक्क बजावणार आहेत. यात पुरूष मतदार पाच लाख ४४ हजार ६१९ तर महिला मतदार पाच लाख ५१ हजार ८२० आहेत. म्हणजेच, जिल्ह्यात पुरूषांच्या तुलनेत सात हजार २०१ महिला मतदारांची संख्या जास्त आहे. म्हणजेच, महिलांचेही एकूण एक मत मिळविणे उमेदवारांसाठी महत्वाचे झाले आहे. कारण, या महिला मतदारांच्या हातीच आता उमेदवारांच्या नशिबाची चाबी दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, सवार्धिक महिला मतदार गोंदिया विधानसभा मतदार संघात असून त्यांची एक लाख ६३ हजार ९१० एवढी संख्या आहे. तर अर्जुनी-मोरगाव मतदार संघात एक लाख २५ हजार ४४१, तिरोडा मतदार संघात एक लाख २९ हजार ६४२ तर आमगाव मतदार संघात एक लाख ३२ हजार ८२७ एवढ्या महिला मतदार आहेत.

तीन मतदार केंद्रांच्या ठिकाणात बदल
जिल्ह्यात एक हजार २८१ मतदान केंद्रांवरून यंदा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान घेतले जाणार आहेत. यात गोंदिया विधानसभा मतदार संघात ३६० व एक सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत. मात्र यातील तीन मतदान केंद्रांच्या ठिकाणांत बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये, केंद्र क्रमांक ५७ ग्राम घिवारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील केंद्र आता ग्राम गोंडीटोला येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत, ३२७ क्रमांकाचे ग्राम पिंडकेपार-शेंद्रीटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील केंद्र आता स्कूलटोली-पिंडकेपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा नंगपुरा मर्री येथे, तर ३५६ क्रमांकाचे ग्राम गुदमा येथील जिल्हा परिषद वरिष्ठा प्राथमिक शाळेतील केंद्र आता ग्रामपंचायत जवळील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत प्रस्तावीत करण्यात आले आहे.
दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर व वाहनाची सुविधा
जिल्ह्यात चार हजार ८१ दिव्यांग मतदार असून त्यांना मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी प्रशासनाकडून पूर्ण सुविधा दिली जाणार आहे. याकरिता ८९९ व्हिलचेअर, ८४५ भिंग तसेच एक हजार २५६ स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, टोल फ्री क्रमांकावर (१९५०) संपर्क केल्यास दिव्यांग मतदारांना घेण्यासाठी वाहन घरी येणार व मतदानाचा हक्क बजावून झाल्यावर त्यांना घरी सोडण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.


Web Title: The key to the luck of the candidates in the hands of women
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.