केशोरी ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:07+5:302021-01-13T05:16:07+5:30
केशोरी : १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या १३ सदस्यीय असलेल्या ग्रामपंचायतीसाठी १४ महिलांसह १२ पुरुष असे एकूण २६ उमेदवार ...

केशोरी ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोरात
केशोरी : १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या १३ सदस्यीय असलेल्या ग्रामपंचायतीसाठी १४ महिलांसह १२ पुरुष असे एकूण २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये ५ प्रभाग असून अनुसूचित जाती महिला, पुरुष एक-एक, अनुसूचित जमातीसाठी महिला, पुरुष एक-एक आणि नामाप्र पुरुष चार, महिला पाच असे आरक्षणानुसार उमेदवार येथील ग्रामपंचायतीसाठी आपआपले नशीब अजमावत आहेत. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांच्या घरोघरी जात असल्याचे दिसून येत आहे.
या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कोरोनाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष होत आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. वातावरणाच्या बदलामुळे थंडीचा जोर कमी होऊन प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. प्रत्येक उमेदवार घरोघरी पोहोचून आपण ग्रामपंचायतसाठी कसे चांगले उमेदवार आहोत याचा दावा करीत आहेत. या ग्रामपंचायतची निवडणूक ऑगस्ट महिन्यात होणार होती, परंतु कोरोना महामारीने निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारांसह राजकारणाशी संबंध येणाऱ्या मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. गावाचा विकास करण्यासाठी आपण चांगले कसे ही भूमिका उमेदवार पटवून देत आहेत. कोणत्याही महिला, पुरुष उमेदवाराच्या तोंडावर मास्क दिसून येत नाही. कोरोना संसर्गाचा प्रसार थांबला नसतानाही फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केले जात आहे. बिनधास्तपणे प्रचारकार्य सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना अथवा आदेशाकडे दुर्लक्ष करून प्रचारकार्यात उमेदवार गुंतले आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने संपूर्ण गावभर प्रचार यंत्रणा आपआपल्या कुवतीनुसार प्रचार करताना दिसून येते. शेवटी गुप्त मतदान पद्धती असल्यामुळे निकालानंतरच मतदारांचा कौल दिसून येईल. प्रत्येक उमेदवार विजयाची स्वप्ने उराशी बाळगून आहेत.