कचारगडला जनसागर उसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:25+5:30
एकीकडे यात्रेच्या ठिकाणी धनेगावला लाखो लोकांची गर्दी जमा होती. तर धनेगावपासून कचारगड गुफेपर्यंत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आजचा दिवस पूर्ण माघ पौर्णिमेचा दिवस असून याच दिवशीच चार ते पाच लाख भाविक कचारगडला येऊन गेले.

कचारगडला जनसागर उसळला
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : आदिवासी समाजाचे मक्का मदिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंडी धर्मभूमी कचारगडला रविवारी (दि.९) देश-विदेशातील आदिवासी भाविकांचा जनसागर उसळला होता. एकीकडे यात्रेच्या ठिकाणी धनेगावला लाखो लोकांची गर्दी जमा होती. तर धनेगावपासून कचारगड गुफेपर्यंत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आजचा दिवस पूर्ण माघ पौर्णिमेचा दिवस असून याच दिवशीच चार ते पाच लाख भाविक कचारगडला येऊन गेले.
धनेगावकडे जाणारे चारही दिशेचे रस्ते सुद्धा गर्दीने फुलून गेलेले दिसले. यात्रा परिसरात वाहनांना उभे ठेवण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. त्यामुळे चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था हाजराफॉल पहाडाजवळ धनेगावपासून दोन कि. मी. दूर तर कचारगडपासून सहा ते सात कि.मी. अंतरावर वाहने उभी ठेवून पायी प्रवास करीत करावा लागला. गर्दीमुळे पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.
७०० जवान तैनात
कचारगड यात्रा सुरळीत पार पडावी व भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात सालेकसा पोलीस स्टेशनसह दरेकसा, पिपरीया आणि बिजेपार एओपीचे ७०० जवान येथे तैनात करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी जालंदर नालकूल, पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, प्रशांत पवार व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस जवान भाविकांना मदत करीत होते.
दर तासाला एक एसटी
कचारगडला येणारे भाविक रेल्वे मार्गासह स्वत:च्या चारचाकी, दुचाकी वाहनावर येत असले तर दरेकसला गाड्यांचा थांबा कमी असल्याने इतर प्रांतातील भाविक गोंदिया, आमगाव किंवा दुर्ग, डोंगरगड रेल्वेस्टेशनकडे अडकून असल्याने गोंदिया ते धनेगाव, दरेकसा दरम्यान गोंदिया बस आगारातून दर तासााल एस.टी. बस सेवा सुरु करण्यात आली. साकोली, भंडारा आगारातील एसटी बसेस सुद्धा धनेगावपर्यंत चालविण्यात आल्या.
आरोग्य विभागाचे कॅम्प
प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गगन गुप्ता यांच्या मार्गदर्शनात यात्रा ठिकाणी एक बेस कॅम्पसह गुप्ता परिसरात आणि जेवन व्यवस्था परिसरात प्राथमिक औषधोपचार कॅम्प लावण्यात आले. यात एक रात्रकालीन कॅप्स सुद्धा असून सहा डॉक्टर आणि ४० आरोग्य कर्मचारी आपली सेवा प्रदान करीत आहेत. या शिवाय ग्रामीण रुग्णालय सालेकसा आणि स्वयंसेवी संस्थेद्वारा व ठिकाणातून औषधोपचार कॅम्प लावण्यात आले. या शिवाय समितीच्या वतीने व स्वयंसेवी लोकांकडून भाविकांना ठिकठिकाणी मोफत भोजन व्यवस्था ठेवण्यात आली. रविवारी अनेक मान्यवरांनी कचारगडला भेट दिली. गोंडी धर्माचार्य यांनी गोंडी धर्म, भाषा, संस्कृती यावर मार्गदर्शन केले. तसेच पौर्णिमेनिमित्त राष्ट्रीय महा गोंगोना कोयापुनेम महासंमेलनचे आयोजन करण्यात आले. यात माघ पौर्णिमा आणि देव पूजनाचे महत्त्व सांगण्यात आले.