शेतीच्या रस्त्यासाठी काकाची हत्या
By Admin | Updated: July 28, 2014 23:36 IST2014-07-28T23:36:31+5:302014-07-28T23:36:31+5:30
शेतीतून जाण्यायेण्याच्या रस्त्याच्या वादातून झालेल्या भांडणात पुतण्याने काकाच्या डोक्यावर काठीने प्रहार करून काकाची हत्या करण्याची घटना तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे घडली.

शेतीच्या रस्त्यासाठी काकाची हत्या
एकोडी : शेतीतून जाण्यायेण्याच्या रस्त्याच्या वादातून झालेल्या भांडणात पुतण्याने काकाच्या डोक्यावर काठीने प्रहार करून काकाची हत्या करण्याची घटना तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे घडली. छगन हरी पारधी (५२) असे मृत इसमाचे नाव आहे.
सेजगाव येथे बोदा रस्त्यावर रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. गंगाझरी पोलिसांनी आरोपी जसवंत नंदराम पारधी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
आरोपी जसवंत पारधी व छगन पारधी या काका-पुतण्यात परंतु मागिल दोन वर्षापासून संबंध चांगले नव्हते. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन त्यांचे वाद होत होते. परंतु रविवारी त्यांचा वाद शेतामधून जाण्या येण्याच्या रस्त्यावरुन झाला होता. काही दिवसांपुर्वी जसवंत नंदराम पारधी याने आपल्या शेतात बोवार पद्धतीने धान पेरणी केली व छगन पारधी याला आपल्या शेतात पाणी जाऊ न देण्यास सांगितले. याच गोष्टीवरून छगनने रविवारी ४.३० ते ५ वाजताच्यादरम्यान जसवंतला आपल्या स्वत:च्या शेतामधून जाण्यास मनाई केली.
त्यांची प्रथम शब्दिक चकमक झाली व नंतर छगनने आरोपी जसवंत पारधीला बैल हाकलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुतारीने मारले. त्याचा पलटवार करत जसवंतने त्याच्या डोक्यावर मोठ्या काठीने (उभारी) वार केला. या घटनेची तक्रार छगन याने स्वत: गंगाझरी पोलिसात जाऊन केली. याचदरम्यान त्याला गोंदिया रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी गंगाझरी पोलिसांनी भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास डीवायएसपी दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (वार्ताहर)