जय सेवाच्या गजराने दुमदुमले कचारगड

By Admin | Updated: February 1, 2015 22:58 IST2015-02-01T22:58:25+5:302015-02-01T22:58:25+5:30

अखिल भारतीय आदिवासी गोंड समाजाचे उगमस्थळ असलेले कचारगड येथे रविवारी सकाळपासून देशभरातील कान्याकोपऱ्यातून आदिवासी भाविकांचे आगमन झाले.

Kachargad is the biggest haul of the Jai service | जय सेवाच्या गजराने दुमदुमले कचारगड

जय सेवाच्या गजराने दुमदुमले कचारगड

सालेकसा : अखिल भारतीय आदिवासी गोंड समाजाचे उगमस्थळ असलेले कचारगड येथे रविवारी सकाळपासून देशभरातील कान्याकोपऱ्यातून आदिवासी भाविकांचे आगमन झाले. जय सेवा जय गोंडवाना जय फडावेनचा गजर कचारगड परिसरात झाला.
गोंडी धर्माचे सप्तरंगी ध्वज घेऊन येणाऱ्या भाविकाने सर्व रस्ते फुलून गेले होते. सायंकाळपर्यंत जवळपास एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी कचारगडला हजेरी लावली. दुपारी १२ वाजता आ. संजय पुराम यांच्या हस्ते राष्ट्रीय गोंडवाना ध्वज फडविण्यात आला. दुपारी १२.३० वाजता गोंडी धर्माचार्य मोती रावण कंगाली यांच्या हस्ते गोंडी धर्माचे प्रतिक असलेले सप्तरंगी ध्वज फडकविण्यात आले. धनेगाव ते कचारगड चार किमी पर्यंत ढोल ताशाच्या गजर करण्यात आला. विधिवत कचारगड यात्रेला सुरूवात झाली. कचारगड यात्रेचा शुभारंभापूर्वी गोंडी धर्माचार्य भूमाल (पुजारी) यांच्या मार्गदर्शनात राणी दुर्गावती व गोंडी देवी-देवतांचे पूजन व नमन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय गोंडवाना गणतंत्र पार्टीचे अध्यक्ष दादा हिरासिंग मरकाम, गोंड राजे वासूदेव शाह टेकाम, कचारगडचे संशोधक एड.मरस्कोल्हे, छत्तीसगड येथील गोंडी इतिहासकार बी.एल. कोराम, आदिवासी सेवक मोहन पंधरे, यवतमाल येथील उपायुक्त किशोर कुंभरे, झारखंड येथील आ. विमला प्रधान,गुरूचरण नायक, फत्तेसिंह कमलेश, पतिराम ताराम यांच्या नेतृत्वात हजारोच्या संख्येत आदिवासी महिला-पुरूष व आबालवृध्द भाविक यात्रेत सहभागी झाले. माता कंकाली देवी, जसेमाल लिंगोबाबाची प्राकृतीक पूजा करण्यात आली.
दरवर्षी आद्य पौर्णिमेला देशभरातील आदिवासी कचारगड येथे येतात. या ठिकाणी आपल्या पूर्वजाना नवस फेडून नवीन ऊर्जा घेऊन जाताना कार्य करण्यासाठी आठवणी सोबत नेतात. वर्षभर आपली नोकरी, व्यवसाय, शेती व इतर कोणतीही कामे व्यवस्थीत करण्यास मदत मिळते अशी या ठिकाणी योजने भाविक आपली मते मांडतात.
आदिवासीचे आराध्य दैवताचे वास्तव्य नैसर्गिक स्थळात असल्यामुळे प्रत्येक भाविकाला नवीन उर्जा मिळत असते.
कचारगड येथे आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असल्याने गैरआदिवासी लोकही मोठ्या संख्येत गुफा पाहण्यासाठी येतात. त्यामुळे लोकांची संख्या लाखोवर आहे. पाच दिवसीय यात्रेदरम्यान महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, बिहार येथील चार ते पाच लाख भाविक येतात. त्याचबरोबर आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, अरूणाचल कडील उत्तरपूर्वी राज्याचे भाविकही हजेरी लावतात.(प्रतिनिधी)

Web Title: Kachargad is the biggest haul of the Jai service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.