हे घोषणाबाजच नाही तर ‘घुमजाव’ सरकार
By Admin | Updated: February 7, 2015 23:25 IST2015-02-07T23:25:24+5:302015-02-07T23:25:24+5:30
जनतेची दिशाभूल करून केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तारूढ झाले. राज्यात या घोषणाबाज सरकारने गेल्या १०० दिवसात एक तरी घोषणा अंमलात आणली का?

हे घोषणाबाजच नाही तर ‘घुमजाव’ सरकार
काँंग्रेसचा हल्लाबोल : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले हजारों कार्यकर्ते व नागरिक
गोंदिया : जनतेची दिशाभूल करून केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तारूढ झाले. राज्यात या घोषणाबाज सरकारने गेल्या १०० दिवसात एक तरी घोषणा अंमलात आणली का? असा सवाल करीत हे घोषणाबाजच नाही तर ‘घुमजाव’ सरकार आहे, असा हल्ला काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते आणि माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, आ.गोपालदास अग्रवाल, आ.सुनील केदार, माजी मंत्री भरत बहेकार, माजी आ.रामरतन राऊत, सेवक वाघाये, अशोक लंजे, अमर वऱ्हाडे, राजेश नंदागवळी, डॉ.योगेंद्र भगत, नामदेव किरसान आदी अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रुपये अनुदान द्या, कृषी उत्पादनाच्या हमीभावात वाढ करा, भूमी अधिग्रहण कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश परत घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करा, गॅस पुरवठा धोरण पुर्ववत करा, ग्रामीण भागातील लोडशेडींग बंद करा अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. दुपारी २ वाजता सर्कस मैदानावरून निघालेला हा मोर्चा २.३० वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. विविध घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या सरकराने सत्तेत आल्यापासून केवळ घोषणाच केल्या आहेत. दिलेल्या आश्वासनांपैकी कोणत्याच आश्वासनाची पूर्तता केली आहे. सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेच्या एका आमदारानेही ही बाब खासगीत कबुल करताना सरकार किती नाकर्ते आहे हे सांगितल्याचे विखे पाटील म्हणाले. सरकारमध्ये संवेदनशीलता नाही. मराठवाड्यासारख्या क्षेत्रात कधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या. मात्र या सरकारच्या काळात तेथील आत्महत्या वाढल्या आहेत. हेच अच्छे दिन आहेत का? असा सवाल करून आता ‘बुरे दिन’ आले असल्याचे ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी हे सरकार शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे नसून केवळ भांडवलदारांचे असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपली खुर्ची वाचविण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणतील तसे निर्णय घेत आहेत, असा आरोप करताना महाराष्ट्रातील उद्योग आणि पाणी गुजरातमध्ये पळविले जात असल्याचे ते म्हणाले.
धानाला ५०० रुपये बोनस दिला नाही तर कोणत्याही खासदार, आमदार, मंत्र्याला गावात येऊ देऊ नका, असे सांगून त्यासाठी काँग्रेस पक्ष आपल्यासाठी आंदोलन करेल, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी आ.गोपालदास अग्रवाल यांनी आपल्या भाषणात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आपली चूक सुधारण्याचे आवाहन केले. (जिल्हा प्रतिनिधी)