३१ कामे प्रगतिपथावर : आतापर्यंत ८३० कामांवर २७ कोटींचा खर्चगोंदिया : शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात भरघोस कामे झाली आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १ हजार ५८ कामे करण्याची मंजुरी मिळाली होती. त्यापैकी ८३० कामे पूर्ण झाली असून त्यावर २६ कोटी ९८ लाख ५५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. अजून ३१ कामे प्रगतिपथावर आहेत.जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून माती नालाबांधची १८ कामे करायची होती ती करण्यात आली आहे. त्या कामावर ९६ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. गॅबियन स्ट्रक्चरची ३४ कामे करायची होती ती कामे पुर्ण करण्यात आली. त्या कामावर १८ लाख ९५ हजार रूपये खर्च करण्यात आले. ६२ शेततळींची कामे करायची होती. त्यातील ६० कामे झाली असून दोन कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांवर ६२ लाख २० हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे. साखळी सिमेंट बंधाऱ्यांची ११४ कामे करायची होती. यातील ५२ कामे पुर्ण झाली आहेत. १४ कामे प्रगतिपथावर आहेत. या कामावर आतापर्यत ४ कोटी ६९ लाख ८४ हजार रूपये खर्च करण्यात आले आहे. सिमेंट बंधारा दुरूस्तीची आठ कामे मंजूर करण्यात आली, त्यातील एक काम पूर्ण झाले तर चार प्रगतिपथावर आहेत. तीन कामे नंतर सुरू करण्यात येणार आहेत. या कामांवर २४ लाख ९० हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. नाला खोलीकरण व सरळीकरणाची २४ कामे मंजूर होऊन १५ कामे पूर्ण झाली आहेत. आठ कामे नंतर सुरू होणार आहेत. या कामांवर एक कोटी ८५ लाख ७८ हजार रूपये खर्च करण्यात आले आहे. ठिकठिकाणी असलेल्या गावतलावांमधून गाळ काढण्याची शासकीय १११ कामे मंजूर झाली असून ९९ कामे पूर्ण झाली आहेत. चार कामे प्रगतिपथावर आहेत तर आठ कामे बंद आहेत. या कामावर ३ कोटी ३१ लाख २४ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. सलग समतल चराची चार कामे करायची होती. ती पूर्ण झाली आहेत. त्या कामावर १५ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या मामा तलावांमधील पाण्याचा वापर करण्यासाठी त्यातील गाळ काढण्याची ६२ कामे सीएसआरअंतर्गत मंजूर झाली होती. त्यातील ४६ कामे पूर्ण झाली असून १६ कामे बंद आहेत. या कामावर २ कोटी ६४ लाख ४५ हजार रूपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ठिंबक सिंचनाची २३९ कामे मंजूर असून ती पुर्ण करण्यात आली. त्यावर ८३ लाख ७४ हजार रूपये खर्च करण्यात आले. तुषार सिंचनाची आठ कामे मंजूर झाली होती ती कामे १ लाख ८६ हजारातून पुर्ण करण्यात आली आहेत. दोन वनतलाव मंजूर झाले. त्यातील एक काम पूर्ण झाले असून दुसरे प्रगतिपथावर आहे. यासाठी ३६ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवाराच्या विविध कामांमुळे पाण्याची पातळी निश्चितपणे वाढेल, असा विश्वास अधिकारी व्यक्त करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)- भातखाचरावर सर्वाधिक खर्च
जलयुक्त शिवारातून वाढणार सिंचन
By admin | Updated: December 20, 2015 01:35 IST