तिरोडा येथील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अनियमिता
By Admin | Updated: December 14, 2015 02:19 IST2015-12-14T02:19:57+5:302015-12-14T02:19:57+5:30
तिरोडा उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील एकूण ४२ गावांसाठी पोलीस पाटील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

तिरोडा येथील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अनियमिता
दोषींवर कारवाई करा : ना आवेदन तपासले, ना गुण जाहीर केले
गोंदिया : तिरोडा उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील एकूण ४२ गावांसाठी पोलीस पाटील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या पोलीस पाटील पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून भ्रष्टाचाराचे गालबोट लागल्याची चर्चा होत आहे.
तिरोडा तालुक्यातील २८ गावे व गोरेगाव तालुक्यातील १४ गावांचे पोलीस पाटील पदाचे अर्ज उपविभागीय अधिकारी तिरोडा येथे जमा झाले. मात्र ३२४ अर्जांची छाननीसुद्धा करण्यात आली नाही व सरळ त्यांना परीक्षेसाठी बोलाविण्यात आले. तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालयात ६ नोव्हेंबर २०१५ ला ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी २ तासांचा वेळ असून ११ ते १ वाजेपर्यंत परीक्षा सुरळीत पार पडली.
लगेच त्या दिवशी २ तासानंतर परीक्षेचा निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. पण उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे यांनी सांगितले की, ९ नोव्हेंबर २०१५ रोजी बुधवारी निकाल जाहीर करण्यात येईल. परंतु त्यांनी ९ नोव्हेंबर २०१५ ला निकाल जाहीर न करता १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता निकाल जाहीर केला. पण त्या निकालामध्ये रोल नंबर आहे. त्यामध्ये पात्र उमेदवारांचे रोल नंबर (बैठक क्रमांक) देण्यात आले आहेत. तिरोडा व गोरेगाव तालुक्यातील ४२ गावांतील पोलीस पाटील पदासाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या निकालात केवळ बैठक क्रमांक बैठक क्रमांक देण्यात आले आहेत, गुण दर्शविलेले नाहीत. यामध्ये १६५ उमेदवारांचे बैठक क्रमांक असून किती गुण कुणाला मिळाले, हे त्यात दिलेले नाही. यावर किती गुणावर उमेदवार पास झाला, असे विचारल्यावर त्यांनी ३६ गुण मिळाले त्यांचे क्रमांक आहे. नंतर त्यांनी नावांची यादी लावली.
सदर प्रकाराबाबत वरिष्ठ कारकून टेंभुर्णे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, तोंडी परीक्षा ही २० गुणांची आहे. तोंडी व ८० गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये मिळालेले गुण अशा एकूण गुणांची यादी शेवटी लावण्यात येईल, असे सांगितले.
उपविभागीय अधिकारी यांनी ४ ते ५ दिवस निकाल लावण्यासाठी उशीर केला आणि किती गुण कुणाला मिळाले, याची यादी लावली नाही. आवेदन स्वीकारल्यानंतर जाहीरनाम्याप्रमाणे आवेदन तपासणीकरिता लेखी परीक्षेसाठी पात्र केले.
३२४ उमेदवारांमध्ये अनेक उमेदवारांचे २५ वर्षे वय पूर्ण नसूनसुद्धा त्यांनी परीक्षा दिली. ४५ वर्षे वयाची अट असून ४५ पूर्ण झालेल्या व ४६ वर्षे सुरू असलेल्या उमेदवारांनीसुद्धा परीक्षेला बसले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पोलीस पाटील पदभर्ती प्रक्रियेमध्ये हुशार उमेदवारांचा पात्र यादीमध्ये रोल नंबर (बैठक क्रमांक) नसून कमी शिकलेल्या उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये गैरप्रकार झाला, अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.
सदर पोलीस पाटील भर्ती प्रक्रिया रद्द करुन पुन्हा निष्पक्ष करण्यात यावी व दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गोरेगाव व तिरोडा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)