Invitation to veterans for the benefit of the district | जिल्ह्याच्या हितासाठी दिग्गजांना आमंत्रण

जिल्ह्याच्या हितासाठी दिग्गजांना आमंत्रण

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल । श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ शताब्दी वर्ष सत्कार समारंभ उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अदानी समूह व अंबानी यांचे गोंदिया जिल्ह्याशी नाते अतूट आहेत. जिल्ह्याच्या विकासात यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. अदानी यांनी तिरोडा येथे सन २०१२ मध्ये ३३०० मेगावॅटचा प्रकल्प उभारला. तर टीना अंबानी यांनी गोंदिया येथे कॅन्सर हॉस्पीटल सुरु केले. सालेकसा सारख्या दुर्गम भागात आरोग्य विषय कार्य करणाऱ्या दिशा संस्थेला अदानी फाऊंडेशनने चार लाख रूपयांचा निधी दिला. याशिवाय विकासाची अनेक भरीव कामे यांच्यामाध्यमातून केली जात आहेत. जिल्ह्याचे हित लक्षात घेता आम्ही देशातील दिग्गजांना आमंत्रण देत अशा या कार्यक्रमांचे आयोजन करीत असल्याचे प्रतिपादन श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाचे अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
येथील श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाच्या शताब्दी वर्ष सत्कार समारंभात शनिवारी (दि.१) अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी, कोकीळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पीटलच्या अध्यक्ष टीना अंबानी, अदानी फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ. प्रीती अदाणी, लेखक व कलाकार पदमश्री मनोज जोशी, गुजरातचे माजी आमदार जयंत पटेल, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल, आमदार विनोद अग्रवाल, आमदार मनोहर चंद्रीकापुरे, आमदार राजू कारेमोरे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, ट्रस्ट बोर्ड सचिव व माजी आमदार हरिहरभाई पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, मंडळाचे उपाध्यक्ष दिपम पटेल, अजय वडेरा, जयंत जसानी, विजय सेठ उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार पटेल यांनी, शतकपुर्ती करणे ही कोणत्याही संस्थेसाठी गौरवाची बाब आहे. श्री गुजराती केलवणी मंडळाच्या स्थापनेनंतर जेव्हा शाळेला सुरूवात झाली तेव्हा फक्त १५ विद्यार्थी होते. मात्र आजघडीला २३०० विद्यार्थी एकाच शाळेत शिक्षण घेत आहेत. वेळेनुरूप शिक्षणात बदल करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. संस्थेच्या शताब्दी वर्षाचा हा कार्यक्रम केवळ देखावा नसून यातही आमचे स्वार्थ आहे. जिल्हा विकासाच्या दृष्टीने यात या दिग्गजांना आमंत्रित केले आहे. गौतम अदानी व डॉ. प्रिती अदानी हे जिल्ह्याच्या विकासकामांना सहकार्य करतात. आता ते १० डायलिसीस मशीन आणून अवघ्या ४०० रुपयांत सेवा देणार आहेत. आता केवळ पॉवरप्लांटच नव्हे तर अदानी समूहाने गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी कृषी क्षेत्रात लक्ष घालून मोठी गुंतवणूक करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी टीना अंबानी यांनी, शिक्षण हे खरे शक्तीकरण आहे. स्वप्नांना साकार करणारे आहे. शिक्षणात सुंदरता व विशालता आहे. त्यामुळे शिक्षणाची महत्ती ओळखून ते ग्रहण केले पाहिजे. शाळेत मिळालेले संस्कार हे जीवनोपयोगी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गौतम अदाणी यांनी, लक्ष्य मोठे ठेवा, लक्ष्याचा पाठलाग करताना प्रचंड मेहनत करा. अपयशाने खचून जाऊ नका. सातत्यपूर्ण पाठलागामुळे यशाचे शिखर गाठता येते. गुरुजनांचा आदर करा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

स्वत:ची मातृभाषा विसरू नका - मनोज जोशी
समाजऋण फेडण्यासाठी स्व. मनोहरभाई पटेल यांनी शिक्षणाचे दालन उपलब्ध करुन दिले. गोंदिया जिल्ह्याला धानाचा कटोरा संबोधतात पण हे तर विद्येचे भांडार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती व केलवणी मंडळाची शतकपूर्ती हा अद्भूत क्षण आहे. शिक्षण हे असे धन आहे की कुणी याची चोरी करु शकत नाही. मातृभाषेचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, स्वत:ची मातृभाषा विसरु नका. जी माता ज्या भाषेत भविष्याची स्वप्ने बघते ती मातृभाषा असते. त्या मातृभाषेचा सन्मान करा. मातृभाषेला घेवून न्यूनगंड बाळगू नका. मातृभाषेमुळे विचार प्रगल्भ व परिपक्व होतात. मी राष्ट्रासाठी काय करणार आहे याविषयी निष्ठा बाळगा. असत्याकडून सत्याकडे घेवून जाणारे ज्ञान असते. ज्ञानार्जनासाठी शिक्षण अत्यंत निष्ठापूर्वक ग्रहण केले पाहिजे असा विद्यार्थ्यांना सल्ला दिला.

स्मरणिकेचे प्रकाशन व दानदात्यांचा सत्कार
या कार्यक्रमात श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाच्या स्थापनेशी जुळलेले दानदाता व ट्रस्टींचे वारस वर्षा पटेल, विजय सेठ, जयंत जसानी, किसन चंदाराना, शरद क्षत्रिय वसंता ठाकूर, मयूर जडेजा, दिपम पटेल, आदित्य पटेल, डॉ. सोनल गुप्ता, हर्ष पटेल, समिधा पटेल यांचा तसेच गुजराती शाळेत शिक्षण घेऊन देशात विविध क्षेत्रात नावलैकिक करीत असलेले डॉ. प्रमोद मुंदडा, डॉ. भावेश भाटिया, डॉ.विकास जैन, मेजर रचना पांचुदे, डॉ.सौरभ पारधी, डॉ.आमिन सिद्धीकी, रिसाम अहमद यांचाही सत्कार करण्यात आला. त्याचप्रकारे, १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाश करण्यात आले.

क्षणचित्रे.....
राज्यसभेचे खा. प्रफुल पटेल यांनी आपल्या भाषणात एक सोडून इतर सर्व बंधू-भगिनींनो असा शब्दोलेख केला. यावेळी मंचावर त्यांच्या पत्नी वर्षा पटेल उपस्थित होत्या. हा शब्दोलेख होताच कार्यक्रमास्थळी उपस्थितांमध्ये हास्य उमटले.
या कार्यक्रमात टीना अंबानी यांनी इंग्रजी व गुजराती भाषेत मार्गदर्शन केले. तर गौतम अदानी हे गुजराती भाषेत बोलले.
महामहिम आनंदीबेन पटेल यांनी खा. प्रफुल पटेल यांच्याकडे बघून गुजराती भाषेतून या देशात दोनच व्यक्ती अशा आहेत की ज्यांचे नाव अदानी व अंबानी आहे, असे उपहासाने सांगितले.

Web Title: Invitation to veterans for the benefit of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.