अपघात विम्याप्रकरणी विमा कंपनीला झटका
By Admin | Updated: March 12, 2015 01:12 IST2015-03-12T01:12:24+5:302015-03-12T01:12:24+5:30
शेतकरी अपघात विम्याच्या प्रकरणात दावा मंजूर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या न्यू इंडिया इंशुरंस कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला.

अपघात विम्याप्रकरणी विमा कंपनीला झटका
गोंदिया : शेतकरी अपघात विम्याच्या प्रकरणात दावा मंजूर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या न्यू इंडिया इंशुरंस कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला. शेतकऱ्याला पत्नीला एक लाख रूपये देण्याचा आदेश सदर न्यू इंडिया विमा कंपनीला दिला.
देवरीच्या वॉर्ड-३ येथील रहिवासी शेतकरी राजकुमार हिरामन वैद्य यांचा मृत्यू ५ मार्च २०१२ रोजी ट्रक चालकाच्या बाजून बसून जाताना ट्रेलरने दिलेल्या धडकेत झाला. त्यांची पत्नी मंजू वैद्य यांनी न्यू इंडिया विमा कंपनीकडे शेतकरी अपघात विम्याचा दावा दाखल केला. मात्र जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटूनही सदर कंपनीने दावा मंजूर किंवा नामंजूर, असे कळविले नव्हते. त्यामुळे तिने नुकसान भरपाईसह त्रासाचा खर्च मिळविण्यासाठी न्यायमंचात तक्रार दाखल केली. न्यायमंचाने विरुद्ध पक्षाचे न्यू इंडिया विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक, क्षेत्रीय व्यवस्थापक व देवरीचे तालुका कृषी अधिकारी यांना नोटिसेस पाठविल्या. त्यांनी न्यायमंचात उपस्थित राहून आपला लेखी जबाब नोंदविला. त्यात मंजू वैद्य यांनी व्हिसेरा रिपोर्ट सादर न केल्यामुळे दावा फेटाळण्यात आल्याचे व तसे कळविल्याचे नमूद केले. तसेच मृतकाच्या रासायनिक पृथ:करणाच्या अहवालाबाबत डॉक्टरांचे अभिप्राय प्रमाणपत्र मिळत नसल्याबाबत वारसदाराचा अर्ज आल्याचे कृषी अधिकाऱ्याने नमूद केले होते. तक्रारकर्ती मंजू वैद्यच्या बाजूने अॅड. उदय क्षिरसागर व विरूद्ध पक्षाच्या बाजूने अॅड.इंदिरा बघेले यांनी युक्तिवाद केला. याबाबत न्यायमंचाने कारणमिमांसा केली. त्यात शेतकरी राजकुमार वैद्य यांचा मृत्यू ट्रक चालकाच्या बाजूने बसून जाताना ट्रेलरच्या धडकेत झाला. शासन निर्णयानुसार रस्ता अपघाताबाबत दावा करताना जे कागदपत्रे लागतात, त्यात कुठेही रासायनिक विश्लेषण अहवालावर संबंधित डॉक्टरचे मत आवश्यक असल्याचा उल्लेख नाही. चालक वगळता शेतकऱ्याचा अपघात झाल्यास वारसदारांना दावा रक्कम देण्याचे स्पष्ट नमूद आहे. (प्रतिनिधी)