आयुष वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST2020-06-24T05:00:00+5:302020-06-24T05:00:20+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर काम करायला तयार होत नाहीत तेथे बीएएमएस डॉक्टरांना तात्पुरत्या नियुक्त्या देऊन त्यांना ४० हजार मानधन दिले जात आहे. सर्वांची शैक्षणिक पात्रता एक असताना नवीन आणि जुना असा भेद का? असा प्रश्न जुन्या नेमणुका असलेल्या आयुष डॉक्टरांना पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संशयित व बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी व कोरोना केअर सेंटरमध्ये सतत काम करावे लागत आहे.

Injustice on AYUSH medical officers | आयुष वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय

आयुष वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय

ठळक मुद्देतुटपुंज्या मानधनासाठी जीव धोक्यात : शासनाचे नव्याला जास्त व जुन्याला कमी मानधन धोरण

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयुष्य वैद्यकीय अधिकारी जीव धोक्यात घालून तुंटपुज्या मानधनावर प्रामाणीकपणे काम करीत आहेत. मात्र शासनाकडून नवीन कर्मचाऱ्यांना जास्त व जुन्या कमी मानधन असे धोरण राबवून अन्याय केला जात आहे. अशात मागील १०-१२ वर्षांपासून सेवा देत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे अशी मागणी कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. नवरत्न गायधने यांनी केली आहे.
आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांंतर्गत कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कोरोना संकटातही रूग्णालयात रेड झोनमधून आलेल्यांची तपासणी करून २४ तास कर्तव्य बजावत आहेत. असे असतानाही त्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय बिल, नियमित रजा, विमा संरक्षण आदि सुविधा दिल्या जात नाहीत. मात्र या अधिकाऱ्यांकडून आयुर्वेदिक चिकित्सेसह प्रसूती, विषबाधा, सर्पदंश, विंचू-श्वान दंश, अपघातातील जखमी रूग्ण, पोलिसांनी आणलेले आरोपी, एम.एल.सी. आदी कामे करवून घेतली जातात. रात्रंदिवस सेवा देत कित्येकांना आता १० वर्षे लोटून गेली आहेत. मात्र एवढ्यानंतरही १०-१२ वर्षांपासून काम करणाऱ्या आयुष डॉक्टरांना २२ हजार व नवीन नियुक्ती दिलेल्यांना २८ हजार रूपये मानधन दिल जात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर काम करायला तयार होत नाहीत तेथे बीएएमएस डॉक्टरांना तात्पुरत्या नियुक्त्या देऊन त्यांना ४० हजार मानधन दिले जात आहे. सर्वांची शैक्षणिक पात्रता एक असताना नवीन आणि जुना असा भेद का? असा प्रश्न जुन्या नेमणुका असलेल्या आयुष डॉक्टरांना पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संशयित व बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी व कोरोना केअर सेंटरमध्ये सतत काम करावे लागत आहे. त्यांना विमा सरंक्षण व पीपीई किट नाही. अतिजोखमीचे काम करून तेवढा दाम मिळत नसल्याने या सर्व कर्मचाऱ्यांत असंतोष आहे. आज ना उद्या आमच्या कामाची दाखल घेतली जाईल या आशेवर ते रोज नियमित काम करीत आहेत. आयुष्यातील १०-१२ वर्षे या सेवेत गेली. दुसरीकडे पुन्हा नवं करिअर कसे सुरू करायचे या विवंचनेत अनेक जण आहेत. तुटपुंज्या मानधनावर जोखीम पत्करून कसं जगायचं व संसार कसा रेटायचा याचीच त्यांना चिंता भेडसावते आहे. शासनाने आता जर कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार केला नाही तर त्यांच्यातील जगण्याची उमेद संपून जाईल. त्यामुळे सरकारने विचार करून वेतन वाढ द्यावी अशी मागणी डॉ. गायधने यांनी केली आहे.

सेवेत कायम करा
शासनाने १७ हजार कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात भरती करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्या ठिकाणी मानधनावर काम केलेल्या अनुभवी कर्मचाºयांना सामावून घ्यावे व त्यांच्या रिक्त ठिकाणी नवीन नियुक्त्या कराव्यात. तसे केले तर ही वेतनातील तफावत दूर होण्यास मदत होईल. मागील १०-१२ वर्षांपासून आम्ही सेवा देत आहोत. आता गेले ३ महिने कोरोना बाधित रूग्णांसोबत विनातक्रार अहोरात्र काम करीत आहोत. किमान याची दखल घ्यावी अशी मागणी हे कर्मचारी करीत आहेत.

Web Title: Injustice on AYUSH medical officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर