भात पिकावर किडींचा प्रादुर्भाव

By Admin | Updated: September 17, 2014 23:56 IST2014-09-17T23:56:12+5:302014-09-17T23:56:12+5:30

निसर्गाच्या लहरीपणामुळे भात पिकांवर विविध रोगांच्या किडींचे संक्रमण सुरू झाले आहे. भात पिकावर रोगाचे प्रादुर्भाव आढळल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी

Infestation of pests on rice crop | भात पिकावर किडींचा प्रादुर्भाव

भात पिकावर किडींचा प्रादुर्भाव

बोंडगावदेवी : निसर्गाच्या लहरीपणामुळे भात पिकांवर विविध रोगांच्या किडींचे संक्रमण सुरू झाले आहे. भात पिकावर रोगाचे प्रादुर्भाव आढळल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक ते उपाय करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी जी.डी. तुमडाम यांनी केले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना भात पिकावर लागणाऱ्या किडींचे व त्यावर करावयाचे उपचार या संबंधाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने संदेश देण्यात आलेला आहे. मानमोडी या रोगाचे प्राथमिक लागण दिसताच नत्र खताचा पुरवठा विलंबाने द्यावा. निंबोळी अर्क ५ टक्के फवारावे. बांधीवरील तन, धसकटे, पालापाचोळा नष्ट करावा. त्यामुळे रोगाचे प्राथमिक लागण होत नाही. रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास ट्रायसायक्लोझोल ७५ डब्ल्यू पी ६ ग्राम किंवा आईप्रोबेन्फोस ४८ ई सी २० ग्राम किंवा आइसोप्रोथिओलेवा ४० इसी १५ मिली किंवा कारपोप्रामिड ३० एससी १० मिली यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाला प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या पेरावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव नसल्याचे कृषी विभागाच्या संदेश पत्रात म्हटले आहे.
धानाची बांधी स्वच्छ ठेवावी. बांधीच्या कडेला रोगाची लागण झाल्यास तेवढ्याच भागात फवारणी करावी. त्यामुळे बांधीच्या आत रोगाची लागण टाळता येईल आणि बुरशी नाशकाचा वापर कमी करता येईल. रोगाची लागण दिसताच सुकोमोनास फ्लुरेसंस २.५ किग्रा वापरावा. नत्र खताच्या मात्रा कमी कराव्यात किंवा विलंबाने द्याव्या. शक्यतो ३ ते ४ आठवड्यात द्यावे असे सुचविण्यात आले आहे. पाने गुंडाळणारी अळी या रोगाच्या प्रादुर्भावावर नियमित लक्ष ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात जर नुकसान १० टक्के पेक्षा अधिक असेल तर कर्टाप हायेड्रोक्लोराईड ५० टक्के पा.मि.भू.१० ग्राम किंवा ट्रायझोफास ४० टक्के ७ मि.ली. किंवा क्लोपायरीफोस २० टक्के १८ मिली, क्लुबेण्डामाईड २० डब्ल्यू जी १२ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
खोडकिडा या किडीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. किडीची अंडी समूह व खादाड अवस्था वेचून नष्ट कराव्यात. शेतात कामगंध सापळे उभारावेत, जेणेकरून किडींचे सर्वेक्षण व काही प्रमाणात नियंत्रण करणे सोपे होईल. जर किडींच्या नुकसानीची तीव्रता ५ टक्के डेड हार्टस चौमी किंवा १ अंडी समूह आढळून आल्यास क्लोपायीफोस २० टक्के २० मिली किंवा मोनोक्रोटोफोस ३६ टक्के १५ मिली, प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कडाकरपा रोगाच्या प्रादुर्भावासाठी धानाची बांधी स्वच्छ ठेवावी. एका बांधीतून दुसऱ्या बांधीत पाणी जाण्याचा प्रवाह टाळावा. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास एग्रीमायसीन १०० किंवा एग्रीमायसीन १०० अधिक फायटोलान यांच्या मिश्रणाची फवारणी करावी. नत्र खताची मात्रा ३ ते ४ आठवड्यात या प्रमाणात द्यावी.
पिकाचे नियमित सर्वे करून लष्करी अळी या किडीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे. भविष्यात या किडीच्या ४ ते ५ अळ्या प्रति चौमी आढळून आल्यास डायक्लोरोव्हास ७६ टक्के ६ मि.ली. किंवा मिथिल प्यारथिओन २ टक्के पा.मि.भू २.५ किग्रा किंवा मोनक्रोटोफोस ३६ टक्के १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यात धानाच्या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये. कदाचित झाल्यास त्यावर वेळीच सल्ला व उपाय सांगण्यासाठी तालुका कृषी अधिकारी तुमडाम यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी मुनेश्वर, राऊत कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, हिंगे, ठाकूर तसेच कृषी सहायक विलास पात्रीकर, अविनाश हुकरे, बोरकर, येरणे, राजमोहन रहांगडाले, मसराम, सूर्यवंशी, बडोले आदी कर्मचारी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे संदेश पत्रात सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Infestation of pests on rice crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.