आदिवासी विकासमंत्र्यांचे सूतोवाच : बोरगाव येथे एकलव्य निवासी शाळेचे भूमिपूजनगोंदिया : आदिवासी समाजातील विद्यार्थी व तरुण-तरुणीच्या क्रीडा कौशल्य विकासासाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन्याचा शासनाचा मानस असल्याचे राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी सांगितले. देवरी तालुक्यातील बोरगाव येथील एकलव्य निवासी शाळेच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार संजय पुराम, आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ.माधवी खोडे, उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार संजय नागटिळक, पंचायत समिती सभापती देवकीबाई मरई, आदिवासी विकास मंडळाचे संचालक भरत दुधनाग व प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे प्रामुख्याने उपस्थित होते.महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिकद्वारा संचालित देवरी तालुक्यातील बोरगाव येथील एकलव्य निवासी पब्लिक स्कूलच्या इमारतीच्या जागेचे भूमिपूजन शनिवारी (ता.१९) ना.सावरा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना सावरा म्हणाले, आदिवासी विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या अनेक योजना हाती घेतल्या आहेत. नामांकित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची योजना शासनाने अतिशय प्रभावीपणे राबविली असून यावर्षी नामांकित शाळा प्रवेशासाठी २५ हजार अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी २२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्याचे हित लक्षात घेता तसेच त्यांच्यामधील सुप्त क्रीडा कौशल्य गुणांना विकसीत करण्यासाठी प्रबोधिनी स्थापन्याचा शासनाचा विचार आहे. या प्रबोधनीच्या माध्यमातून आदिवासी समाजातील गुणवान तरुण-तरुणी राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावण्यासाठी तयार होतील असा विश्वास यावेळी ना.सावरा यांनी व्यक्त केला.यावेळी शाळेच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच हजार रुपयांचा धनादेश सावरा यांना सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी आदिवासी विभागातर्फे चालणाऱ्या योजनांची माहितीही प्रकल्प अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. आभार प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)
क्रीडा कौशल्यासाठी स्वतंत्र प्रबोधिनी
By admin | Updated: December 20, 2015 01:30 IST