वाहनांच्या धुरामुळे श्वसनाच्या आजारात वाढ
By Admin | Updated: November 10, 2016 00:40 IST2016-11-10T00:40:05+5:302016-11-10T00:40:05+5:30
वाहनांच्या इंधन टाक्यामध्ये होणाऱ्या रॉकेलच्या वापराने सर्व सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वाहनांच्या धुरामुळे श्वसनाच्या आजारात वाढ
रॉकेलचा सर्रास वापर : संबधित विभागाचे कारवाईकडे दुर्लक्ष
रावणवाडी : वाहनांच्या इंधन टाक्यामध्ये होणाऱ्या रॉकेलच्या वापराने सर्व सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाहनाच्या गडद धुरामुळे नागरिकांना विविध श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रॉकेलचा इंधन म्हणून ट्रॅक्टर, आॅटोत वापर होत असल्यामुळे या वाहनामधून मोठा धूर निघत असतो. त्या धुरामुळे आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत आहे. वाहनात इंधन म्हणून वापरण्यात येणाऱ्या डिझेलचे भाव वाढत असल्याने आणि ते परवडण्यासारखे नसल्यामुळे ट्रॅक्टर मालक गावोगावी फिरून रॉकेल उच्च दरात खरेदी करून वाहनामध्ये इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर रॉकेलच्या वापर करतात. अशा वाहनावर कुठे कारवाई झाली असल्याची ऐकीवात नाही.
ग्रामीण भागात ट्रॅक्टरची संख्या मोठ्याने वाढली आहे. रॉकेल वापरण्याचा प्रकारात ट्रॅक्टर मालक आघाडीवर आहेत. गरजू नागरिकांना विक्रेत्याकडून रॉकेल मिळत नाही. ट्रॅक्टर मालकाना उच्च किंमतीत मुबलक प्रमाणात रॉकेल उपलब्ध होत आहे. याच रॉकेलचा इंधन म्हणून वापर होत असल्यामुळे वाहनातून मोठ्याने धूर निघत आहे.
या धुरामुळे सर्व सामान्य नागरिकांना श्वसनाचा आजार जडत आहे. सध्या स्थितीत डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे वाहन धारक रॉकेल खरेदीकडे वळला आहे कमी पैशात जास्तीचा नफा कमविण्याच्या बेतात सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.
रॉकेल विक्रेत्याची कुणाकडूनही तक्रार होत नसल्यामुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच् चालला आहे. दुप्पट दराने रॉकेल विक्री करून विक्रेते आपली आर्थिक स्थिती बळकट करीत आहेत. मात्र गरजू नागरिकांना रॉकेल मिळणे मोठे अवघड झाले आहे. मात्र वाहन धारकांना उच्च दरात मुबलक रॉकेल उपलब्ध होत असल्यामुळे ग्रामीण भागातील वाहन अति जास्त गडद धूर ओकत आहेत. या प्रकाराकडे संबंधीत विभागाने लक्ष देऊन वाहनाच्या टाक्या तपासणी मोहीम हाती घेण्याचा गरज सध्या निर्माण झाली आहे. परंतु परिवहन विभाग किंवा पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)