शैक्षणिक साहित्याच्या किमतीत वाढ
By Admin | Updated: June 4, 2014 23:49 IST2014-06-04T23:49:49+5:302014-06-04T23:49:49+5:30
शासनाने शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा व सक्तीचे शिक्षण कायदा लागू केला आहे. मात्र भविष्यात गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षीच्या शैक्षणिक

शैक्षणिक साहित्याच्या किमतीत वाढ
वाढत्या महागाईचा फटका : वह्या, कंपास आदींवर १0 ते २0 टक्क्यांनी वाढ
गोंदिया : शासनाने शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा व सक्तीचे शिक्षण कायदा लागू केला आहे. मात्र भविष्यात गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षीच्या शैक्षणिक साहित्याच्या किंमती १0 ते २0 टक्यांनी वाढल्या आहेत. यामुळे वाढत्या महागाईनंतर आता शैक्षणिक साहित्याच्या किंमती दुप्पटीने वाढल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांवरील शिक्षणाच्या बोझात आणखी वाढ झाली आहे.
शासनाच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गंत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासनाकडे नऊ लाख ४७ हजार पुस्तकांची मागणी केली आहे. शाळेतून केवळ आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके मिळत असल्याने आठवीनंतरच्या विद्यार्थ्यांना बाजारातून पाठय़पुस्तकांची खरेदी करावी लागते. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बाजारपेठेतून नोटबुक, कंपास, ड्रॉईंग वही, साध्या वह्या, पेन व अन्य साहित्यांची खरेदी करावी लागते. मात्र दरवर्षी शैक्षणिक साहित्याच्या किमती दुप्पटीने वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खांद्यावरील शिक्षणाचा बोझा दरवर्षी वाढतच आहे.
प्रत्येक आई-वडीलांचे स्वप्न असते की, आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घेऊन यशाचे शिखर गाठून आपले नाव मोठे करावे. यासाठी ते आपल्या अन्य गरजांमध्ये काटकसर करुन आपल्या पाल्यांच्या शिक्षणात कुठलीही अडचण येऊ देत नाही. गरीब कुटुंबांतील लोकांना देखील आता शिक्षणाचे महत्व कळले असल्याने ते देखील मोलमजुरी करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देत असतात. मात्र दिवसेंदिवस वाढत्या शैक्षणिक साहित्याच्या किंमती व प्रवेश शुल्काने त्यांच्यासमोर समस्यांचे डोंगर निर्माण झाले आहे.
शाळा सुरु होण्याकरिता अजुन १0 ते १५ दिवस वेळ असला तरी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केली. यासाठी बाजारपेठेतील शैक्षणिक साहित्यांची दुकाने देखील सजू लागली आहेत. सध्या बाजारपेठेत मागील वर्षी ज्या वह्यांची किंमत १0 रुपये होती त्याची किंमत १५ ते ३0 रुपये, रजिस्टर २0 रूपयांपासून २५ ते ३५ रूपयांपर्यंत, ड्रॉईंग वही १५ ते ३0 रुपये, कंपासपेटी ५0 ते १२५ रुपये, पेन १0 ते १५ रुपये तर दफ्तर २00 ते ६00 रुपये दराने विक्री केले जात आहेत. काही वस्तुंवर तर २0 ते ३0 रुपयांची वाढ झाली आहे. बर्याच पुस्तक विक्रेत्यांनी मागील दोन-तीन वर्षापासून पाठय़पुस्तके विक्रीस आणणे बंद केले आहे. शाळेतूनच विद्यार्थ्यांंना पाठय़पुस्तके मिळत असल्याने बाजारपेठेतील विक्रेत्यांकडील स्टॉक तसाच पडून राहतो. वाढत्या किंमतीने पाठय़पुस्तक विक्रेते देखील हैराण झाले आहेत.
पाठय़पुस्तके, नोटबुक व अन्य शैक्षणिक साहित्य खरेदी करताना पालकांची मोठी अडचण होत आहे. त्यांचे महिन्याचे बजेट देखील ढासळले आहे.
बाजारपेठेत पाठय़पुस्तकांची दुकाने सज्ज झाली असली तरी अजुन या दुकानांमधील गर्दीत वाढ झाली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पुढील आठवड्यापासून गर्दी वाढण्याचे संकेत एका पुस्तक विक्रेत्याने लोकमतशी बोलताना दिले. (शहर प्रतिनिधी)