गंगाबाईत असामाजिक तत्वांचा शिरकाव
By Admin | Updated: September 2, 2014 23:51 IST2014-09-02T23:51:20+5:302014-09-02T23:51:20+5:30
येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय जिल्ह्यात एकमेव शासकीय महिला रुग्णालय आहे. या रुग्णालयात महिन्याकाठी ६०० महिलांची प्रसुती केली जाते. या प्रसुतीसाठी गोरगरीब रुग्णांचे नातेवाईक येत

गंगाबाईत असामाजिक तत्वांचा शिरकाव
गोंदिया : येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय जिल्ह्यात एकमेव शासकीय महिला रुग्णालय आहे. या रुग्णालयात महिन्याकाठी ६०० महिलांची प्रसुती केली जाते. या प्रसुतीसाठी गोरगरीब रुग्णांचे नातेवाईक येत असल्याने त्यांना धमकावून लुटमार करण्याच्या घटना रात्रीच्यावेळी घडत असतात. मागील काही दिवसांपासून पुन्हा गंगाबाई स्त्री रुग्णालयात असामाजिक तत्वांचा शिरकाव होऊ लागला आहे.
दोन वर्षापूर्वी गंगाबाई स्त्री रुग्णालयात असेच असामाजिक तत्व वावरत होते. त्यामुळे रात्रीच्यावेळी प्रसुतीसाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना धमकावून, चमकावून लुटणे व मारहाण करणे या घटना पुढे आल्या होत्या. त्यानंतर लोकमतने वारंवार बातम्या प्रकाशित करून या रुग्णालयात पोलीसांची चौकी देण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात पोलिसांची चौकी देण्यात आली. दर ८ तासासाठी एक पोलीस कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केला जातो. परंतु रात्रीच्या वेळी राहणारे पोलिस कर्मचारी गंगाबाई परिसरात गस्त न घालता आपल्या खोलीत झोपा काढत असल्याने असामाजिक तत्वांचे येथे फावते. परिणामी लागोपाठ घटना घडत असतात.
रविवारच्या दुपारी एका इसमाने चुटीया येथील मोहीनी शरणागत या तीन वर्षाच्या मुलीला पळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सोमवारच्या पहाटे २ वाजता तीन ते चार अज्ञात इसमांनी गंगाबाई येथे असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकाला चाकू दाखवून धमकाविले. तीन ते चार अज्ञात इसम चोरी करण्याच्या उद्देशाने धर्मशाळेत वावरत असताना गंगाबाई तर्फे ठेवण्यात आलेल्या सुरक्षा सेवकांनी त्या इसमांना हटकले. त्यावर त्या सुरक्षा रक्षकांशी त्या इसमांचा वाद झाला. सुरक्षा सेवक धर्म शाळेत येण्यापूर्वी धर्म शाळेतील एका व्यक्तीचा मोबाईल चोरी गेल्याचे लक्षात आले. सदर इसम १५ ते २० मिनिटाने रुग्णालयाच्या बाहेर पडले. सुरक्षा रक्षक सुरेंद्र राऊत याला चाकूचा धाक धमकाविल्यामुळे रुग्णालयात काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र यावेळी पोलीस चौकीतील कोणताही पोलीस त्या ठिकाणी आला नाही.
यापूर्वी गोंदिया शहर पोलिसांची चमू रात्रीच्यावेळी गस्त घालायची. त्यामुळे असामाजिक तत्व वावरत नव्हते. मात्र पोलिसांची पेट्रोलिंग बंद झाल्याने तसेच गंगाबाईच्या परिसराला लागून पानटपरी, चहाटपरी व पडक्या शासकीय इमारतीचा आधार घेवून रात्रीच्यावेळी हे असामाजिक तत्व गंगाबाईतील रुग्णांच्या नातेवाईकांना लुटण्याचा किंवा त्यांना हाणी पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. पहाटे घडलेल्या या प्रकाराला गंगाबाईतील सी.सी.टीव्ही कॅमऱ्यांनी टिपले आहे. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके यांनी गोंदिया पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, आरोग्य संचालक, उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)