जिल्ह्यात एकाच गावातील 62 जनावरे लम्पीने आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 10:08 PM2022-10-19T22:08:31+5:302022-10-19T22:08:57+5:30

जिल्ह्याच्या सर्व सीमा पशुधनासाठी सील करण्यात आल्या होत्या. बैल बाजार भरविण्यावर बंदी आणण्यात आली होती. सर्व जनावरांचे बाजार पशू प्रदर्शने,आंतर राज्यामधील व राज्यातील जिल्ह्यांतर्गत गोवंशीय व महिष वर्गीय पशुवाहतूक,बैलगाडा शर्यती यावर बंदी घालण्यात आली आहे. गोंदिया तालुक्यातील रायपूर या एकाच गावात लम्पीची जनावरे आढळली. यात ६२ पैकी ४४ जनावरे लम्पी मुक्त झालीत. १५ जनावरांवर उपचार सुरू आहे. ३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. 

In the district, 62 animals from one village are sick with lumpy | जिल्ह्यात एकाच गावातील 62 जनावरे लम्पीने आजारी

जिल्ह्यात एकाच गावातील 62 जनावरे लम्पीने आजारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  राजस्थान, पंजाब, गुजरातसह आता महाराष्ट्रातही लम्पी दाखल झाला. गोंदिया जिल्ह्यांमध्ये पशुधनाला त्वचा रोगाचा प्रादुर्भाव फक्त एका गावात झाला. गोंदिया तालुक्यात असलेल्या आणि मध्यप्रदेशच्या बाॅर्डर असलेल्या रायपूर या एकाच गावात लम्पीने ६२ जनावरे आजारी पडलीत. यात तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. 
लम्पी या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यांमध्ये पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना,खबरदारी करण्याबाबत सूचना वरिष्ठ स्तरावरून पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत. 
त्यानुसार जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता खबरदारीच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने आपल्या अधिनस्थ यंत्रणेला दिल्या होत्या. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर, धुळे, लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, परभणी, नाशिक या १९ जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला होता. आता हळूहळू राज्यभर लम्पी पसरला आहे.  गोंदियाच्या पशुसंवर्धन विभागाने गोंदियाला अलर्ट केले होते. जिल्ह्याच्या सर्व सीमा पशुधनासाठी सील करण्यात आल्या होत्या. बैल बाजार भरविण्यावर बंदी आणण्यात आली होती. सर्व जनावरांचे बाजार पशू प्रदर्शने,आंतर राज्यामधील व राज्यातील जिल्ह्यांतर्गत गोवंशीय व महिष वर्गीय पशुवाहतूक,बैलगाडा शर्यती यावर बंदी घालण्यात आली आहे. गोंदिया तालुक्यातील रायपूर या एकाच गावात लम्पीची जनावरे आढळली. यात ६२ पैकी ४४ जनावरे लम्पी मुक्त झालीत. १५ जनावरांवर उपचार सुरू आहे. ३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. 

मध्यप्रदेशातून लागण तर झाली नाही ना?
महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या काठावर रायपूर हे गाव आहे. या गावातील जनावरे नदीवर पाणी पिण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी लागण तर होऊन जनावरे इकडे तर आली नाहीत ना असा संशय व्यक्त केला जात आहे. 

 उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा
लम्पी त्वचारोगामध्ये जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके,मान,पाय,कास आदी ठिकाणी गाठी येतात तसेच तोंडात घशात व श्वसननलिका,फुप्फुसात पुरळ व फोड येतात. जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळती होते. जनावरांना अशक्तपणा येतो व भूक मंदावते. डोळ्यांमध्ये जखमा तयार होतात. या रोगामुळे गाभण जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो. हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये,याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये,याकरिता आवश्यक ती काळजी घ्यावी.

३३०७ जनावरांना लस
- देवरी या गावात ६५२ पैकी ६५० जनावरांना लस देण्यात आली. दोन जनावरे गरोदर असल्याने त्यांचे लसीकरण झाले नाही. रायपूरच्या पाच किमी अंतरात येणाऱ्या गावातील जनावरांची संख्या ३ हजार ३०७ आहे. या जनावरांना ३ हजार ४५० लस देण्यात आल्या आहेत.

अशी घ्या खबरदारी
बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्याची व्यवस्थित स्वच्छता ठेवावी. आजार सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा,योग्य जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी,बाधित जनावरांवर तत्काळ व योग्य उपचार केले आणि अबाधित क्षेत्र शंभर टक्के लसीकरण केले तर,या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते.

 

Web Title: In the district, 62 animals from one village are sick with lumpy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.